दुसऱ्या दिवशीही कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:22 IST2021-03-01T04:22:16+5:302021-03-01T04:22:16+5:30
विनामास्क दिसल्यास दंडात्मक कारवाई... शहरातील ५ नंबर चौक परिसरात सकाळी ११.३० वा. पोलिसांकडून वाहनांची तपासणी केली जात होती. वाहनातील ...

दुसऱ्या दिवशीही कडकडीत बंद
विनामास्क दिसल्यास दंडात्मक कारवाई...
शहरातील ५ नंबर चौक परिसरात सकाळी ११.३० वा. पोलिसांकडून वाहनांची तपासणी केली जात होती. वाहनातील विनामास्क असलेल्यांना विनाविलंब दंड आकारण्यात येत होता. पोलिसांच्या दंडापासून बचाव करण्यासाठी काही जण ५ नंबर चौकाच्या परिसरात येताच चेहऱ्यास मास्क लावत होते. दंड आकारण्याबरोबरच पोलिसांकडून मास्क वापरण्यासंदर्भात जनजागृती केली जात होती.
बसस्थानक परिसर रिकामाच...
दुसऱ्याही दिवशी मुख्य मध्यवर्ती बसस्थानकात अल्प प्रमाणात प्रवासी दिसून येत होते. त्यामुळे नेहमी गर्दी आणि गोंगाट असलेल्या स्थानकाचा परिसर रिकामाच दिसून येत होता. अत्यावश्यक कामानिमित्ताने बाहेरगावी जाणारेच प्रवासी दिसून येत होते. परिणामी, काही मार्गावरील बसेसमध्ये अवघे १० ते १२ प्रवासी दिसून येत होते.
विवाह तिथीमुळे काहींची रेलचेल...
रविवारी विवाहाची तिथी असल्याने काही जणांची नाईलाजास्तव रेलचेल सुरू होती. मात्र, प्रवासी वाहतूक करणारी ऑटो, टमटम, काळी पिवळी अशी वाहने रस्त्यावरून धावताना दिसून आली नाहीत. केवळ खासगी वाहने धावत होती. जनता कर्फ्यूमुळे ऑटोथांबा ठिकाणे निर्मनुष्य असल्याचे पाहावयास मिळाले.
चौकाचौकात पोलीस बंदोबस्त...
शहरातील गंजगोलाई, छत्रपती शिवाजी महाराज चौक, ५ नंबर चौक, दयानंद गेट, जुना रेणापूर नाका, राजीव गांधी चौक, हनुमान चौक या भागात पोलीस बंदोबस्त होता. यावेळी रस्त्यावर विनामास्क दिसून आल्यास त्याच्यावर दंड आकारण्यात येत होता. त्यामुळे रस्त्यावर दुसऱ्याही दिवशी शुकशुकाट दिसून येत होता.