चाकूरच्या डेडिकेटेड कोरोना हेल्थ सेंटरमधील तज्ज्ञ डॉक्टरांवर ताण वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:14 IST2021-05-03T04:14:54+5:302021-05-03T04:14:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चाकूर : कोरोनाबाधित गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर महिनाभरापूर्वी सुरु ...

चाकूरच्या डेडिकेटेड कोरोना हेल्थ सेंटरमधील तज्ज्ञ डॉक्टरांवर ताण वाढला
लोकमत न्यूज नेटवर्क
चाकूर : कोरोनाबाधित गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर महिनाभरापूर्वी सुरु करण्यात आले आहे. महिनाभरात तिथे १०० रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते. त्यापैकी ५१ रुग्ण उपचारानंतर घरी गेले. मात्र, गंभीर असलेल्या ३३ रुग्णांना लातूर, उदगीरला पाठविण्यात आले. दुर्दैवाने यातील १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात कोविडचे १२ तर सारीच्या ४ रुग्णांचा समावेश आहे. तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने रेफरचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.
चाकूर शहरासह तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. गंभीर रुग्णांवर उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात ३० खाटांचे डेडिकेटेड कोरोना हेल्थ सेंटर सुरु करण्यात आले. त्यासाठी ऑक्सिजनची सुविधा करण्यात आली. या सेंटरची जबाबदारी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. पुरुषोत्तम कोडगिरे, डॉ. संग्राम नरवटे, डॉ. प्रियंका चव्हाण यांच्याकडे देण्यात आली. ही तज्ज्ञ मंडळी अहोरात्र सेवा देत आहेत. सेंटरसाठी १० परिचारिका देण्यात आल्या आहेत. नव्याने भरती केलेल्या सहा परिचारिका येथे देण्यात आल्या. परंतु, सध्या हे आरोग्य कर्मचारीही अपुरे पडत आहेत. तसेच डॉक्टरांवरील ताणही वाढला आहे. त्यात रुग्ण गंभीर झाल्यास त्याला लातूर, उदगीरला खाट उपलब्ध करून पाठवावे लागत आहे.
तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या कमी पडत आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मीकांत केंद्रे, डॉ. अरुण बालकुंदे यांची नेमणूक या सेंटरमध्ये करण्यात आली. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, येथे आणखीन चार तज्ज्ञ डॉक्टरांची गरज आहे. त्याचबरोबर आणखी सहा परिचारिकांचीही आवश्यकता आहे. वैद्यकीय सेवा वाढविणे गरजेचे आहे. या सेंटरमधील एखाद्या रुग्णाची प्रकृती खालावली तर तिथे सर्वाधिक वेळ डॉक्टरांना द्यावा लागत आहे. रुग्ण गंभीर झाल्यास त्याला पुढील उपचारासाठी खाट उपलब्धतेपासून रुग्ण पोहोच करण्यापर्यंत डॉक्टरांना काळजी घ्यावी लागत आहे.
भाजपचे आरोग्यमंत्र्यांना साकडे...
येथील सेंटरमध्ये ऑक्सिजन तयार करणाऱ्या छोट्या पाच मशीन आहेत. आणखीन पाच मशीन उपलब्ध करणे गरजेचे आहे, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. रुग्णाला व्हेंटिलेटरची आवश्यकता भासल्यास येथे ती सुविधा उपलब्ध नाही. चाकुरात व्हेंटिलेटर ५, ऑक्सिजन खाटा १० तसेच एम. डी., फिजिशियन, भूलतज्ज्ञ असे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बालाजी पाटील यांनी केली होती. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आरोग्यमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून या सुविधा देण्याची मागणी केली आहे.
सुविधांचा अभाव कायम...
येथे ५० खाटांचे डेडिकेटेड कोरोना हेल्थ सेंटर सुरु करण्यात आले आहे. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर, आराेग्य कर्मचारी आवश्यक आहेत. सध्या सुविधांचा अभाव आहे. मध्यंतरीच्या काळात औषधे संपुष्टात आली होती. शासनाकडून औषधांचा वेळेवर पुरवठा होत नसल्याचे दिसून येत आहे.
महिनाभरात १२ जण दगावले...
डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये तज्ज्ञ डॉक्टर, ऑक्सिजन सुविधा गरजेची आहे. सध्याच्या परिस्थितीत डॉक्टरांवर ताण वाढला आहे. महिनाभरात कोविडचे १२ तर सारीचे ५ रुग्ण दगावले आहेत. जिथे शक्य होईल, तिथे व्हेंटिलेटरची संख्या वाढविणे गरजेचे आहे.
- डॉ. दीपक लांडे, वैद्यकीय अधीक्षक.