सोशल मीडियातील अनोळखी मैत्री महागात पडेल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:16 IST2021-05-29T04:16:29+5:302021-05-29T04:16:29+5:30
तक्रारदाराची अडचण ! ज्याचे शोषण झालेले असते तो तक्रारदार बदनामी होईल म्हणून पोलिसात येत नाही. आला तरी तक्रार दाखल ...

सोशल मीडियातील अनोळखी मैत्री महागात पडेल !
तक्रारदाराची अडचण !
ज्याचे शोषण झालेले असते तो तक्रारदार बदनामी होईल म्हणून पोलिसात येत नाही. आला तरी तक्रार दाखल करण्याची तयारी नसते. अशावेळी पोलीस तक्रारदाराचे शोषण थांबवू शकतात, मात्र गुन्हेगारांचा शोध लावण्यास अडचणी येतात.
पोलिसांमुळे जीवदान
प्रतिष्ठित व्यक्तीला असेच फसवून धमकावल्याचे एक प्रकरण समोर आले आहे. त्या व्यक्तीने स्वत:चा जीवही धोक्यात घालण्यापर्यंत निर्णय घेतला. परंतु, पोलिसांनी त्यांचे समुपदेशन केले. मुळात दोन प्रौढ व्यक्तीतील सहमतीने झालेला संवाद सार्वजनिक करण्याची धमकी देणारा गुन्हेगार आहे. ज्याचे शोषण झाले, ती व्यक्ती अजाणतेपणे आहारी गेलेली असते, त्यामुळे त्यांना पोलीस संपूर्ण विश्वासात घेऊन सहकार्य करतात, असे पोलीस उपनिरीक्षक आवेज काझी यांनी सांगितले.
महिलांचीही फसवणूक
महिलांना मेसेज पाठवायचा, त्याला जर चुकून रिप्लाय दिला तर त्याचे स्क्रीन शॉट काढायचे नंतर कुटुंबीयांना दाखविण्याची धमकी द्यायची, असेही प्रकार घडतात. तक्रार दिल्यानंतर विनयभंगाचे खटले दाखल झाले आहेत. महिलांचे सोशल मीडियातील प्रोफाईल वारंवार पाहणे, एकार्थाने त्यांचा तंत्रज्ञानाद्वारे पाठलाग करणे हा गुन्हा आहे. तसेच दोन व्यक्तींमधील संवादाचे रेकॉर्डिंग करणे, इतरांना पाठविणे हाही गंभीर गुन्हा असल्याचे पोलिसांनी सांगितले.
जागरुक राहावे : पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे
जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे म्हणाले, अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका. अपरिचितांशी चॅटिंग करू नका. आपली व्यक्तीगत माहिती सार्वजनिक करू नका, याउपरही कोणी धमकावत असेल तर सायबर सेलचे पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी संपर्क साधावा.