जिल्ह्यात यंदा वेळेवर पेरणी होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. त्यासाठी खत, बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. मात्र, महाबीजचे सोयाबीन बियाणे उपलब्ध नसल्याचे फलक विक्रेत्यांनी दुकानासमोर लावले आहेत. साठेबाजी करून जादा दराने सदर बियाणे विकण्याचे षडयंत्र आहे. मोठ्या प्रमाणात बियाणे उपलब्ध असताना बियाणे नसल्याचे फलक दुकानदार लावत असल्याने शेतकऱ्यांमध्ये गोंधळ उडाला आहे. यावर्षी शासनाने महाडीबीटी पोर्टलवर महाबीज बियाणे आरक्षित करून ठेवले आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांनी नोंदनी न केल्याने खुल्या बाजारातही महाबीज सोयाबीन बियाणांना मोठी मागणी आहे. महाबीजने लातूर जिल्ह्यात ४८ हजार क्विंटलची मागणी केली असताना सध्या २० हजार क्विंटल बियाणांतही कृषी वितरक काळाबाजार करीत आहेत. अनेक कृषी वितरकांकडून लातूर जिल्ह्यासाठी आलेले बियाणे आंध्र, कर्नाटकच्या शेतकऱ्यांना ज्यादा दराने विकले जात आहे. वितरक डमी शेतकरी दाखवून बनावट सातबारा तसेच इतर कागदपत्रांचे बनावट रेकॉर्ड तयार करून बियाणांची विक्री करत आहेत आणि नियमानुसार बियाण्यांची विक्री करत असल्याचे भासवत आहेत, तर काही वितरक बोगस बियाण्यांची विक्री करत असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच जुने खत नव्या दराने विकणे, नवे खत चढ्या दराने विक्री करून लिंकिंग करण्याचे प्रकार घडत आहेत. कृषी विभागाने बियाणे वितरकांची नियमित तपासणी करून साठेबाजी, काळाबाजार आणि लिंकिंग थांबवावी अन्यथा अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासले जाईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आला आहे. कृषी विभाग, महाबीज यांनी पूर्ण नियंत्रण ठेवल्यास असे प्रकार घडणार नाहीत. मात्र, यात कृषी विभागच सहभागी असल्याने कुंपणच शेत खात असल्याची स्थिती आहे. कोणाकडे दाद मागावी, अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. दरवर्षी शेतकरी भरडला जात आहे. या गंभीर बाबीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन करीत आहे, निवेदनही दिले आहे; परंतु आंदोलनाची भाषा अधिकाऱ्यांना समजत नसल्याने आता तोंडाला काळे फासले जाईल, असा इशारा मनसेने दिला आहे. निवेदनावर संतोष नागरगोजे, डॉ. नरसिंह भिकाणे, भागवतराव शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
महाबीजचे २० हजार क्विंटल सोयाबीन बियाणे उपलब्ध असताना साठेबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:16 IST