मागील कामगिरीच्या जोरावर मिळणार क्रीडा ग्रेस गुण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:17 IST2021-05-30T04:17:18+5:302021-05-30T04:17:18+5:30
लातूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या वर्षात क्रीडा स्पर्धा झाल्या नाहीत. त्यामुळे इयता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसह प्रशिक्षक व पालकांमध्ये गुण ...

मागील कामगिरीच्या जोरावर मिळणार क्रीडा ग्रेस गुण
लातूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या वर्षात क्रीडा स्पर्धा झाल्या नाहीत. त्यामुळे इयता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसह प्रशिक्षक व पालकांमध्ये गुण मिळणार की नाही असा संभ्रम होता. मात्र, शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मागील कामगिरी ग्राह्य धरत खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा ग्रेस गुण देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे क्रीडा क्षेत्रातून समाधान व्यक्त होत आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शुक्रवारी याबाबत निर्णय जाहीर केला असून, राज्य मंडळाच्या सचिवांना याबाबत सुचविले आहे. दरम्यान यासाठी महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाच्यावतीने पाठपुरावा करण्यात आला होता. २०२०-२१ या वर्षांत परीक्षा देणाऱ्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण देण्याबाबत स्पष्ट केले आहे. त्यानुसार दहावी परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांना इयत्ता आठवी, नववीमध्ये खेळलेल्या कामगिरीच्या आधारावर गुण देण्याचे ठरविले आहे तर १२ वी परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांना अकरावीमधील क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेऊन गुण देण्याची नीती अवलंबावी असे कळविले आहे. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यातील इयत्ता दहावी, बारावीमधील खेळाडू विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आला असून, ही सवलत केवळ २०२०-२१ या वर्षाच्या परीक्षेकरिता मिळणार आहे. स्पर्धा नसल्याने खेळाडू विद्यार्थी क्रीडा ग्रेस गुणसाठी हवालदिल झाले होते. मात्र, शासनाच्या या निर्णयामुळे खेळाडू विद्यार्थ्यांमधून आनंद व्यक्त होत आहे.
निर्देश येताच प्रस्ताव स्वीकारू...
याबाबत निर्देश येताच क्रीडा ग्रेस गुणांच्या प्रस्तावांची छाननी करून शिक्षण मंडळाकडे इयत्ता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची शिफारस करू, असे जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी सांगितले.
खेळाडूंचे नुकसान टळले...
यंदाच्या वर्षात स्पर्धा न झाल्याने क्रीडा ग्रेस गुणसाठी पेच निर्माण झाला होता. क्रीडा ग्रेस मिळाले नसते तर खेळाडू खचले असते. राज्याच्या क्रीडा विभागाने योग्य निर्णय घेऊन खेळाडूंचे नुकसान टाळले, असे अर्जुनवीर काका पवार म्हणाले.
खेळाडूंच्या हिताचा निर्णय...
राज्य शासनाने खेळाडूंचा विचार करत गतवर्षीच्या कामगिरीवर क्रीडा गुण देण्याचे ठरविले. हा निर्णय स्वागतार्ह असून, यामुळे खेळाडूंचे नुकसान टळले असे, राज्य क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर यांनी सांगितले.