क्रीडा संकुले बंद; खेळाडूंमध्ये नाराजीचा सूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:19 IST2021-03-26T04:19:14+5:302021-03-26T04:19:14+5:30
गुरुवारी जिल्ह्याच्या क्रीडा विभागाने २६ मार्चपासून पुढील आदेश येईपर्यंत जिल्हा क्रीडा संकुल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे क्रीडा ...

क्रीडा संकुले बंद; खेळाडूंमध्ये नाराजीचा सूर
गुरुवारी जिल्ह्याच्या क्रीडा विभागाने २६ मार्चपासून पुढील आदेश येईपर्यंत जिल्हा क्रीडा संकुल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे क्रीडा क्षेत्रातून नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील विविध खेळांच्या प्रशिक्षक व खेळाडूंनी जिल्हाधिकारी यांना संकुले सुरू ठेवण्याबाबत विनंती करून निवेदन दिले आहे. या निवेदनात खेळाडूंनी सकाळ व सायंकाळच्या सत्रात सरावाला परवानगी द्यावी, वॉकिंग करणाऱ्या नागरिकांमुळे संकुलात गर्दी होत असल्याने केवळ खेळाडूंनाच क्रीडा संकुलात प्रवेश द्यावा, अशी मागणी केली आहे. यासह गतवर्षी लॉकडाऊनमुळे खेळाडूंचा सराव थांबल्याने खेळाडूंचे वजन वाढून कौशल्यावर परिणाम झाला आहे. यासह यंदाच्या वर्षात स्पर्धा न झाल्याने खेळाडूंचे मनोबल खचले आहे. याचा विचार करून तसेच खेळाडूंच्या भावना व हित लक्षात घेऊन केवळ खेळाडूंसाठी संकुल सुरू ठेवावे, असेही म्हटले आहे. निवेदनावर सूरज सूर्यवंशी, अविनाश अडसूळ, विशाल वगरे, प्रल्हाद सोमवंशी, रणजित राठोड, समाधान बुर्गे, शैलेश पडोळे, जागृती चंदनकेरे, आशा झुंजे, शोएब शेख, अब्दुल शेख, महेश बेंबडे, भास्कर नला, अमोल सूर्यवंशी, श्रीनिवास इंगोले, विजय खानापुरे, राधा गोरे, मोहसीन खान, रूपाली शिंदे, प्रकाश गिरी, सुबोध टिळक यांच्यासह अनेक खेळाडू, प्रशिक्षकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
मदिरालये सुरू, क्रीडा संकुल बंद...
क्रीडा संकुलात खेळाडू कोरोनाच्या नियमांचे पालन करीत सराव करतो. शहरात मदिरालये सुरू असून, खेळाडूंचे मंदिर असलेले क्रीडा संकुल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. क्रीडा संकुल गर्दीच्या कारणावरून बंद होते. मात्र, मदिरालयावर गर्दी होत नाही का, असे राष्ट्रीय खेळाडू अब्दुल शेख म्हणाले.
या निर्णयाचा विचार व्हावा...
जिल्हा प्रशासनाने खेळाडूंचा विचार करून क्रीडा संकुले केवळ खेळाडूंसाठी सुरू ठेवावी. क्रीडा संकुलाची निर्मिती केवळ खेळाडूंसाठी केली आहे. मात्र, संकुलात वजन कमी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक असते. पहिलेच खेळाडू कोरोनाच्या महामारीने त्रस्त झाला आहे. यापुढे संकुल बंद ठेवले तर खेळाडूंच्या कामगिरीवर येणाऱ्या स्पर्धेवर परिणाम होईल. या बाबींचा विचार करून खेळाडूंसाठी संकुल सुरू ठेवावे, असे प्रशिक्षक सूरज सूर्यवंशी यांनी सांगितले.