हरंगुळ बु. : लातूर तालुक्यातील हरंगुळ बु. येथे सोयाबीन टोकण लागवड करण्यात आली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी शेतकरी बालाप्रसाद मानधने यांच्या शेतामध्ये टोकण यंत्राने टोकण कशी करावी, याबाबतचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
सोयाबीन टोकण पद्धतीने लागवड केल्याने एकरी आठ ते दहा किलो बियाणे पुरेसे आहे. पीक जोमदार वाढते. शेंगा भरपूर लागतात आणि एकरी १८ ते २० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. यामुळे टोकण पद्धतीने सोयाबीनची लागवड अधिक फायदेशीर आहे, असे यावेळी गावसाने यांनी सांगितले.
कृषी सहाय्यक रेश्मा शेख यांनी हरंगुळ बु. गावात राबविलेल्या योजनांची माहिती दिली. बीजप्रक्रिया करुन सोयाबीनची पेरणी करावी तसेच रुंद, वरंबा पद्धतीने पेरणी केल्यास अवर्षण काळातही उत्पादनात वाढ शक्य असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाला अरुण वाघमारे, महेबूब शेख, कलिमा मेहबूब शेख, बालाप्रसाद मानधने, बाबू मानधने, बद्रीनारायण मानधने, बालू मानधने, सुवर्णा मानधने, नारायण मानधने, आदींसह शेतकरी उपस्थित होते.