घनकचऱ्याचे व्यवस्थापन कोलमडले ; नागरिकांत संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:13 IST2021-06-30T04:13:45+5:302021-06-30T04:13:45+5:30
जळकोट शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचे काम एका कंत्राटदार मार्फत करण्यात येत आहे. मात्र शहर स्वच्छतेचे काम समाधानकारक नसल्याची तक्रार नागरिकांकडून ...

घनकचऱ्याचे व्यवस्थापन कोलमडले ; नागरिकांत संताप
जळकोट शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचे काम एका कंत्राटदार मार्फत करण्यात येत आहे. मात्र शहर स्वच्छतेचे काम समाधानकारक नसल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. सध्या शहरात रस्ते झाडून स्वच्छता करण्यात येत असली तरी कचऱ्याचे ढिगारे उचलून न नेता ठिकठिकाणी रस्त्यावरच ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे मोकाट जनावरे कचरा विस्कटून टाकत आहेत. ज्यामुळे दुर्गंधी निर्माण होत आहे.
भरवस्तीत रस्त्यावर जिकडे तिकडे कचऱ्याचे ढिगारे असल्याने शहराला उकिरड्याचे स्वरुप येत आहे. नगर पंचायत प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना अनेक यातनांना तोंड द्यावे लागत आहे. जळकोट तालुका मुख्यालयाचे शहर असून नगरपंचायत अस्तित्वात आहे. घनकचरा व्यवस्थापनाचे कंत्राटही देण्यात आलेले आहे पण तरीही कचरा शहरातच पडून राहत असल्याने बाहेरुन येथे येणाऱ्या व्यक्तींसमोर जळकोट शहराची पुरती शोभा होताना दिसून येत आहे. स्वच्छ जळकोट, सुंदर जळकोटची घोषणा करुन कचऱ्याचे ढिगारे चौका चौकात, मुख्य रस्त्यावर किंवा जमेल तिथे ठेवण्यात येत असल्याने या अजब कारभाराबद्दल चर्चा होताना दिसत आहे. रस्ते झाडून जमा करून ठेवलेला कचरा परत शहरातील दुकानांत, घराघरांत जाऊन पोहोचत असल्याने सर्वजण त्रस्त झाले आहेत.
स्वच्छतेकडे लक्ष देण्याची मागणी...
घनकचरा व्यवस्थापनावर प्रशासनाचे नियंत्रण आहे की नाही असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. एकीकडे कोरोना महामारीचे संकट घोंघावत असताना शहर स्वच्छतेचे तीन तेरा होत आहेत. दुर्गंधीमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, तत्काळ स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी शहरातील नागरिकांमधून होत आहे.