उदगीरात सलग दुसऱ्या दिवशीही हत्या
By Admin | Updated: May 27, 2016 16:39 IST2016-05-27T16:39:01+5:302016-05-27T16:39:01+5:30
उदगीर शहरात गुरुवारी भरदुपारी अज्ञात तिघा चोरट्यांनी एका महिलेची हत्या केल्याच्या वृत्ताची शाई वाळत नाही तोच शुक्रवारी पुन्हा एका व्यवसायिकाची हत्या झाली.

उदगीरात सलग दुसऱ्या दिवशीही हत्या
ऑनलाइन लोकमत
उदगीर, दि. २६ - उदगीर शहरात गुरुवारी भरदुपारी अज्ञात तिघा चोरट्यांनी एका महिलेची हत्या केल्याच्या वृत्ताची शाई वाळत नाही तोच शुक्रवारी पुन्हा एका व्यवसायिकाच्या हत्येने उदगीरात खळबळ उडाली़. सकाळी ११ ते १२ वा़ सुमारास उदगीरनजीकच्या मोरतळ तांडा येथे मनोज काशिनाथ मळगे (वय ३५) या फोटोफ्रेम व्यवसायिकाचा गळा आवळून हत्या झाल्याचे उघडकीस आले़.
उदगीर येथील मनोज काशिनाथ मळगे यांचा फोटोफ्रेम करण्याचा व्यवसाय होता़ नेहमीप्रमाणे मनोज मळगे हे गुरुवारी आपल्या दुकानकडे गेले होते़ मात्र, रात्री ते परतलेच नाहीत़ त्यामुळे नातेवाईकांनी त्यांचा रात्री उशिरापर्यंत शोध घेतला़ सकाळीही ते न परतल्याचे पाहून उदगीर ग्रामीण पोलिसात मनोज मळगे हे हरवल्याची तक्रार दिली़.
या तक्रारीवरुन पोलिस शोध घेत असताना शहरानजीकच्या मोरतळा तांडा येथे एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास पोलिसांना मिळाली़ त्यावरुन पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन चौकशी केली असता सदरील मृतदेह हा मनोज मळगे यांचा असल्याचे निष्पन्न झाले़ मनोज मळगे यांचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले़
आर्थिक देवाणघेवाणीतून घटना?
मयत मनोज मळगे यांचे बंधू अॅड़ महेश मळगे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, एका व्यक्तीकडून मनोजचे ४० हजार रुपये येणे होते़ त्याने ते पैसे गुरुवारी सायंकाळी वसूल केले़ त्याची माहिती त्याच्या सोबतच्या मित्रांना होती़ त्यामुळे ही घटना आर्थिक देवाण- घेवाणीतून घडली असावी, असा संशय व्यक्त केला़
उदगीर बंद़़
उदगीर येथील किरणा व्यापारी प्रशांत पेन्सलवार यांच्या पत्नी प्रणिता पेन्सलवार यांचा तीन अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी दुपारी खून केला़ या घटनेच्या निषेधार्थ शहरातील व्यापाऱ्यांनी शुक्रवारी बाजारपेठ बंद ठेवली आहे़