सुगंधी तंबाखूची चोरट्या मार्गाने विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:20 IST2021-05-11T04:20:09+5:302021-05-11T04:20:09+5:30
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान लातूर : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे ...

सुगंधी तंबाखूची चोरट्या मार्गाने विक्री
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान
लातूर : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, चार तालुक्यांत वीसहून अधिक जनावरे वीज पडल्याने मृत्युमुखी पडली आहेत. निलंगा, औराद शहाजानी, जळकोट, चाकूर, अहमदपूर, आदी तालुक्यांत अवकाळी पाऊस बरसला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून तत्काळ मदत करण्याची मागणी होत आहे.
शहरातील बाजारपेठेत संचारबंदीमुळे शुकशुकाट
लातूर : लातूर शहरात ८ ते १३ मे दरम्यान संचारबंदीची कडक अंमलबजावणी केली जात आहे. त्यामुळे विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, गांधी चौक, गंजगोलाई, रेणापूर नाका, पाच नंबर चौक, आदी भागांत पोलिसांची पथके नियुक्त करण्यात आली आहेत. नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये, मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे.
खरीप हंगामासाठी कृषी विभागातर्फे मार्गदर्शन
लातूर : खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला असून, कृषी विभागाच्या वतीने पेरणी क्षेत्र तसेच बी-बियाणांचे नियोजन केले जात आहे. यंदा शेतकऱ्यांनी घरगुती बियाणांचा वापर करावा, यासाठी गावस्तरावर कृषी विभागाच्या वतीने ऑनलाईन कार्यशाळा घेतल्या जात आहेत. तसेच बियाणे आणि खतावर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
श्री. हेमरेड्डी मलम्मा यांची जयंती साजरी
लातूर : प. पू. श्री. हेमरेड्डी मलम्मा यांची जयंती राज्य यलम समाज कर्मचारी सेवा संघाच्या वतीने साजरी करण्यात आली. राज्याध्यक्ष मच्छिंद्र गुरमे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सत्यवान माचपल्ले, विजयकुमार पिनाटे, अंगद चामवाड, प्रकाश बंडापल्ले, निरंजन रेड्डी, गोविंद माडे, पांडुरंग वलमपल्ले, सुरेखा गुरमे, गोपिका बुड्डे, महानंदा बंडापल्ले, आदींसह महाराष्ट्र राज्य यलम समाज कर्मचारी सेवा संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
एनसीसीच्या विद्यार्थ्यांचा मदतीसाठी पुढाकार
लातूर : शहरात संचारबंदी लागू करण्यात आली असून, पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी एनसीसीचे विद्यार्थी सरसावले आहेत. शहरातील पोलीस पथकांसमवेत एनसीसीचे विद्यार्थी संचारबंदीचे पालन करण्यासाठी नागरिकांना आवाहन करीत आहे. शहरातील दयानंद गेट परिसर, पाच नंबर चौक, एक नंबर चौक, महात्मा गांधी चौक, रेणापूर नाका, अंबाजोगाई रोड, आदी ठिकाणी एनसीसीचे विद्यार्थी आपली सेवा बजावीत आहेत. दरम्यान, एनसीसी विद्यार्थी पोलिसांच्या मदतीसाठी सरसावले असल्याने त्यांचे कौतुक होत आहे.
ग्रामीण भागात अधिग्रहणाची मागणी
लातूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईची दाहकता वाढली असून, जवळपास ८१ हून अधिक गावांनी अधिग्रहणाची मागणी पंचायत समिती स्तरावर केली आहे. तसेच या प्रस्तावांची तहसील स्तरावरून पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतर उपाययोजना राबविण्याबाबत निर्णय होणार आहे. टंचाई निवारणाची कामे प्रगतिपथावर असून, ज्या गावांनी प्रस्ताव सादर केले आहेत, त्यांना तत्काळ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.