डासोत्त्पत्ती वाढल्याने दैठण्यात धूर फवारणी सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:42 IST2021-09-02T04:42:38+5:302021-09-02T04:42:38+5:30
तालुक्यातील दैठणा परिसरात महिनाभर पावसाने दडी मारली होती. परंतु, पंधरा दिवसांपासून सतत रिमझिम पाऊस होत आहे. त्यामुळे सखल भाग, ...

डासोत्त्पत्ती वाढल्याने दैठण्यात धूर फवारणी सुरु
तालुक्यातील दैठणा परिसरात महिनाभर पावसाने दडी मारली होती. परंतु, पंधरा दिवसांपासून सतत रिमझिम पाऊस होत आहे. त्यामुळे सखल भाग, डबके, गटारीत पाणी साचल्याने डासोत्पत्ती वाढली आहे. सर्दी, ताप, खोकला अशा आजारांचे रुग्ण दिसून येत आहेत. सायंकाळी तर डासांचा खूपच त्रास होत आहे. त्यामुळे डासोत्पत्ती रोखण्यासाठी गावात धूर फवारणी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांतून होत होती.
सरपंच लक्ष्मीबाई बिरादार, उपसरपंच सिताराम पाटील, ग्रामसेवक अनिल जाधव यांनी ग्रामपंचायत सदस्यांची बैठक घेऊन गावात सर्वत्र धूर फवारणी करण्याचा निर्णय घेतला. दोन- तीन दिवसांपासून गावातील विविध भागात फाॅगिंग मशीनच्या साह्याने धूर फवारणी करण्यात येत आहे. त्यासाठी योगेश बिरादार, परमेश्वर बिरादार, अमोल बिरादार हे परिश्रम घेत आहेत. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
नागरिकांनी स्वच्छता पाळावी...
पावसाळ्यात होणारे साथीचे आजार टाळण्यासाठी तसेच डासोत्पत्ती रोखण्यासाठी नागरिकांनी नळाला तोट्या बसवाव्यात, घरासमोरील गटारीत पाणी साचू देऊ नये, उघड्यावर शौचास जाऊ नये, रस्त्यावर कचरा टाकू नये, घराचा परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन उपसरपंच सिताराम पाटील, ग्रामसेवक अनिल जाधव यांनी केले आहे.