रुग्णसंख्येत किंचित घट; पाॅझिटिव्हिटी दरही उतरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:20 IST2021-05-06T04:20:48+5:302021-05-06T04:20:48+5:30
लातूर : गेल्या चार-पाच दिवसांपासून रुग्णसंख्येत किंचित घट होताना दिसत आहे. एप्रिल महिन्याचा पाॅझिटिव्हिटी रेट ३० टक्के होता. आता ...

रुग्णसंख्येत किंचित घट; पाॅझिटिव्हिटी दरही उतरला
लातूर : गेल्या चार-पाच दिवसांपासून रुग्णसंख्येत किंचित घट होताना दिसत आहे. एप्रिल महिन्याचा पाॅझिटिव्हिटी रेट ३० टक्के होता. आता त्यात तीन टक्क्यांनी घट झाली असून, तो २७ टक्क्यांवर आला आहे. चाचण्यांचे प्रमाणही एप्रिल महिन्यासारखेच असताना ही घट झाल्याचे दिसत असल्याने थोडा दिलासा मिळाला आहे.
१, ८, १५, २१ आणि २८ एप्रिल या पाच दिवसांमध्ये रॅपिड अँटिजन आणि आरटीपीसीआर मिळून २० हजार २४७ चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यात ६ हजार १६ रुग्ण आढळले, तर १, २, ३ आणि ४ मे या चार दिवसांत १७ हजार ४२८ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ४ हजार ६६० बाधित रुग्ण आढळले. एप्रिल महिन्यातील पाच आणि मे महिन्यातील चार दिवसांची आकडेवारी चाचण्यांची आणि बाधितांची आकडेवारी पाहिली असता रुग्णसंख्येत घट झाल्याचे दिसत आहे.
आरटीपीसीआरपेक्षा रॅपिड अँटिजन चाचण्या अधिक
आरटीपीसीआर चाचण्यांपेक्षा रॅपिड अँटिजन चाचण्या अधिक झाल्या आहेत. दोन्ही चाचण्यांतील पाॅझिटिव्हिटी रेट मिळून २७ टक्क्यांच्या आसपास आहे. २० ते २७ टक्क्यांपर्यंत पाॅझिटिव्हिटी रेट आहे.
एप्रिल महिन्यामध्ये दोन्ही मिळून १ लाख ३१ हजार २५ चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यात ३९ हजार ३९४ रुग्ण आढळले. त्याचा पाॅझिटिव्हिटी रेट ३० टक्के आहे.
गेल्या २३ एप्रिलपासून बाधितांपेक्षा रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जिल्ह्याला थोडा दिलासा मिळाला आहे. टेस्टिंग वाढविल्यामुळे रोगनिदान लवकर होऊन वेळेत उपचार मिळाल्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. आताही टेस्टिंगवर भर देण्यात आला आहे. एका बाधितामागे २५ ते ३० जणांचा काॅन्टॅक ट्रेस केला जात आहे. - डाॅ. गंगाधर परगे,
जिल्हा आरोग्य अधिकारी.