साहेब, शाळेस नवीन इमारत कधी होणार? ग्राम दरबारात गावकऱ्यांनी मांडल्या अडीअडचणी
By हरी मोकाशे | Updated: February 28, 2025 19:42 IST2025-02-28T19:41:32+5:302025-02-28T19:42:26+5:30
गावकऱ्यांनी शाळेची समस्या मांडल्यानंतर बीडीओ तुकाराम भालके यांनी शाळेची पाहणी केली.

साहेब, शाळेस नवीन इमारत कधी होणार? ग्राम दरबारात गावकऱ्यांनी मांडल्या अडीअडचणी
लातूर : दर्जेदार शिक्षण मिळते म्हणून आम्ही आमच्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत पाठवितो. पण, शाळेची इमारत मोडकळीस आली आहे. पावसाळ्याच्या दिवसांत गळती लागले. साहेब, आमच्या गावच्या शाळेची नवीन इमारत कधी होणार? असा सवालवजा विनवणी तालुक्यातील जेवळी येथील नागरिकांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे शुक्रवारी केली.
शासन योजना, सेवा ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर मिळाव्यात विभागीय आयुक्तांनी एक दिवस गावकऱ्यांसाेबत (ग्राम दरबार) उपक्रम राबविण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार लातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तुकाराम भालके यांनी जेवळी गावास भेट देऊन तेथील नागरिकांशी संवाद साधत विविध योजनांची माहिती दिली. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी एम.डी. मुक्तापुरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर.एच. पवार, बालविकास प्रकल्प अधिकारी जे.डी. माळी, विस्तार अधिकारी सिध्देश्वर नल्ले, ग्रामसेविका शिल्पा किनीकर, बाबूराव करमले, निखिलेश पाटील, पद्माकर होळकर, धनंजय वैद्य, अनिल कुंभारे आदी उपस्थित होते.
अंगणवाडीमार्फत पाककृती...
गरोदर माता व बालकांच्या विकासासाठी अंगणवाडीमार्फत पाककृतीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. पशुसंवर्धन शिबीराबराेबर आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. शासन योजनांची माहिती देण्यात आली.
प्रस्ताव तयार करावा...
गावकऱ्यांनी शाळेची समस्या मांडल्यानंतर बीडीओ तुकाराम भालके यांनी शाळेची पाहणी केली. शाखा अभियंता पाटील यांना प्रस्ताव तयार करुन वरिष्ठांकडे पाठविण्याच्या सूचना केल्या.
गावकऱ्यांशी थेट संवाद
एक दिवस गावकऱ्यांसोबत उपक्रमामुळे गावकऱ्यांशी थेट संवाद होत आहे. नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यात येणार आहेत.
- तुकाराम भालके, गटविकास अधिकारी.