साहेब, रेमडेसिविर इंजेक्शन गरजेचे आहे, कोठे मिळेल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:20 IST2021-04-20T04:20:33+5:302021-04-20T04:20:33+5:30
लातूर : कोरोना रुग्ण व नातेवाईकांच्या मदतीसाठी मनपाने टोल फ्री मदत कक्ष सुरू केला असून, या कक्षाकडे दररोज ३० ...

साहेब, रेमडेसिविर इंजेक्शन गरजेचे आहे, कोठे मिळेल !
लातूर : कोरोना रुग्ण व नातेवाईकांच्या मदतीसाठी मनपाने टोल फ्री मदत कक्ष सुरू केला असून, या कक्षाकडे दररोज ३० ते ३५ काॅल मदत घेण्यासाठी येत आहेत. साहेब, रेमडेसिविर इंजेक्शन कोठे मिळेल, ऑक्सिजन बेड उपलब्ध होईल का? अशी विचारणा होत आहे.
महानगरपालिकेने २४ तास मदत कक्ष कार्यान्वित केला आहे. या कक्षात शिफ्टवाईज सहा कर्मचारी आहेत. एकावेळी दोघे कर्मचारी रुग्ण नातेवाईकांचे काॅल रिसिव्ह करतात. उपलब्ध ऑक्सिजन बेड तसेच जनरल बेड, आयसीयू, रेमडेसिविर औषधांच्या उपलब्धतेबाबत मार्गदर्शन करतात. सध्या यातील बहुतांश काॅल रेमडेसिविर औषध कोठे मिळते, या अनुषंगाने आहेत. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने रेमडेसिविर इंजेक्शन संदर्भात न्यायिक पद्धतीने वाटपाची यंत्रणा कार्यान्वित केली आहे. दररोज उपलब्ध होणारे रेमडेसिविर इंजेक्शन कोणाला कुठे दिले, यासंदर्भाची माहिती प्रसिद्ध केली जात आहे. तरीही सद्यस्थितीत या इंजेक्शनचा तुटवडा आहे. वाॅर रुममध्ये येणाऱ्या ३० ते ३५ काॅलपैकी ८० टक्के काॅल रेमडेसिविरच्या इंजेक्शनबाबत येत आहेत, असे वाॅर रुममधील कर्मचाऱ्यांनी सांगितले. ऑक्सिजन आणि आयसीयू बेडच्या उपलब्धतेबाबतही उर्वरित काॅल्स आहेत.
महानगरपालिकेत सहा कर्मचारी मदत कक्षामध्ये कार्यरत आहेत. संभाजी देवकुळे, श्रीमती एस. व्ही. औटी, एम. पी. चिकाटे, एस. एम. कलकुटे, पी. के. चव्हाण, किरण कांबळे या सहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती मदत कक्षामध्ये आहे. २४ तास सेवा या कर्मचाऱ्यांची सुरू आहे.
महानगरपालिकेच्या हद्दीत एकूण ३५ रुग्णालये आहेत. या ३५ रुग्णालयात दर दोन तासांनी आयसीयू बेड, ऑक्सिजन बेड, जनरल बेडच्या उपलब्धतेची माहिती दर दोन तासाला अपडेट केली जाते. याची माहिती काॅल करणाऱ्या नागरिकांना दिली जाते.
रुग्ण नातेवाईकांच्या मदतीसाठी महानगरपालिकेने मदत कक्ष कार्यान्वित केला आहे. या कक्षामध्ये एकूण सहा कर्मचारी नातेवाईकांच्या मदतीला आहेत. ज्यांना मदतीची गरज आहे, त्यांनी मदत कक्षातील ९१५८६३२३३३ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. यावर उपलब्ध बेडची माहिती तत्काळ कळेल.
- विक्रांत गोजमगुंडे, महापौर मनपा
मनपा हद्दीत एकूण ३५ हाॅस्पिटल्स आहेत, तर जिल्ह्यात कोविड उपचाराची ४२ हाॅस्पिटल्स आहेत. या सर्व हाॅस्पिटल्समध्ये १ हजार ८१५ जनरल बेड आहेत. आयसीयू बेडची संख्या ६२१ असून, सद्यस्थितीत ६५३ जनरल बेड्स रिक्त असल्याचे वाॅर रुममधून कळाले, तर आयसीयूचे अकरा बेड रिकामे असल्याचेही सांगण्यात आले. त्यात शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या सुपरस्पेशालिटी हाॅस्पिटलमधील दोन आयसीयू बेड रिकामे असल्याची माहिती मदत कक्षातून कळाली.