साहेब, दवाखान्यात जातोय, औषधे आणायला जातोय..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:18 IST2021-04-12T04:18:11+5:302021-04-12T04:18:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवार-रविवार वीकेंड लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, या काळात बाहेर पडणाऱ्या ...

साहेब, दवाखान्यात जातोय, औषधे आणायला जातोय..!
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवार-रविवार वीकेंड लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, या काळात बाहेर पडणाऱ्या नागरिकांची नाक्या-नाक्यावर चौकशी करण्यात आली. बहुतांश जणांनी साहेब, मी रुग्णालयात डबा घेऊन जातोय, तर काही जणांनी मेडिकलला औषध आणण्यासाठी जात असल्याचे कारण सांगितले.
जिल्हाभरात कडक लाॅकडाऊन पाळण्यात आला. शनिवार-रविवार असे दोन दिवस रस्त्यांवर सर्वत्र शुकशुकाट होता. काही अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने आणि व्यवहार ठप्प होते. चौका-चौकांत पोलिसांचा खडा पहारा होता, तर २३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांनी नाकाबंदीही केली होती. घराबाहेर पडलेल्या नागरिकांची, वाहनधारकांची कसून चौकशी केली जात होती. ज्यांच्याकडे कारणे नाहीत, अशांवर मात्र काही ठिकाणी पोलिसांनी दंडुका उगारला, तर काहींना दंडही ठोठावला.
दोन दिवसांत जवळपास अडीच लाख रुपयांचा दंड जिल्हाभरात वसूल करण्यात आला आहे. सायंकाळच्या सुमारास शहरालगत असलेल्या शेतीत गेलेले नागरिक परतताना आढळून आले. त्यांनी मात्र शेतीचे कारण सांगून आपली सुटका करून घेतली.
शनिवारी झालेली कारवाई
लातूर जिल्ह्यातील २३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वीकेंड लाॅकडाऊन कडकडीत पाळण्यात आला. विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर कारवाई करीत दंड वसूल करण्यात आला आहे.
रविवारी झालेली कारवाई
लाॅकडाऊनच्या दुसऱ्या दिवशीही लातूर शहरात चौका-चौकांत पोलिसांची तपासणी मोहीम सुरू होती. दरम्यान, विनाकारण घराबाहेर पडलेल्या नागरिकांवर पोलिसांनी थेट कारवाई केली आहे.
बाहेर येणाऱ्यांची कारणे सारखीच...
लाॅकडाऊनच्या काळात घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांकडून सांगितली जाणारी ९० टक्के कारणे सारखीच असल्याचे आढळून आले आहे. मेडिकल आणि दवाखाना हीच कारणे बहुतांश जणांनी सांगितल्याचे पोलिसांनी सांगितले.