कारेपूर पाटी ते खंलग्री रस्त्याची चाळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:19 IST2021-03-08T04:19:42+5:302021-03-08T04:19:42+5:30
किनगाव ते खलंग्रीपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले आहेत. मात्र, खलंग्री ते कारेपूर पाटीपर्यंतच्या ८ किमी रस्त्यावर खड्डे बुजविण्यात आले ...

कारेपूर पाटी ते खंलग्री रस्त्याची चाळणी
किनगाव ते खलंग्रीपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले आहेत. मात्र, खलंग्री ते कारेपूर पाटीपर्यंतच्या ८ किमी रस्त्यावर खड्डे बुजविण्यात आले नाहीत. परिणामी, रस्त्याची चाळणी झाल्याने प्रवास करणे अवघड झाले आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष हाेत असल्याने या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रेणापूर तालुक्यातील खलंग्री ते कारेपूर पाटी या आठ किलोमीटरचा रस्ता जागोजागी उखडल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत. शिवाय, गिट्टी उघडी पडली आहे. या रस्त्यावरून ऊस वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ वाढली आहे. या अवजड वाहनांमुळे खड्ड्याचा आकारमान दिवसागणिक वाढत आहे. गुत्तेदाराने तीन महिन्यांपूर्वी अर्धा कि.मी.चे काम थातूरमातूर केले आहे. खड्डे बजविण्याचे अर्धवट काम साेडून गेल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत. परिणामी, या रस्त्यामुळे मोटारसायकल चालकांना खडी उडून लागत आहे. अनेक चारचाकी वाहनाचे चेंबर फुटण्याच्या घटना घडत आहेत. यातून वाहनांचे माेठ्या प्रमाणावर नुकसान हाेत आहे. हा रस्ता लातूरला जाण्यासाठी पर्यायी जवळचा मार्ग आहे. यासाठी अहमदपूर -किनगाव-कारेपूर-रेणापूर-लातूरमार्गे वाहनांची मोठी संख्या आहे. रस्त्यात आठ किलोमीटर अंतरामध्ये जवळपास असेच लहान-मोठे खड्डे पडले आहेत.
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनधारकांना, प्रवाशांना मणक्यांचा त्रास वाढला आहे. संबंधित विभागाने लक्ष देत रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी त्रस्त प्रवासी, वाहनधारकांतून होत आहे.
रस्ता दुरुस्तीसाठी प्रक्रिया सुरू...
रेणापूर उपविभागीय सार्वजनिक बांधकाम कार्यालयाचे उपविभागीय अभियंता ओमप्रकाश सारडा यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, हा रस्ता खराब झाला आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी प्रक्रिया सुरू आहे. येत्या तीन-चार दिवसांत रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला प्रारंभ केला जाणार आहे. यातून वाहनधारक आणि स्थानिक नागरिकांची गैरसाेय टळणार आहे.