मंदिरे उघडायला हवीत काय; कोणत्या पक्षाला काय वाटते?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:42 IST2021-09-02T04:42:29+5:302021-09-02T04:42:29+5:30
लातूर : कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे निर्बंध उठवताना शासन खबरदारी घेत असून, लाट रोखण्यासाठी ...

मंदिरे उघडायला हवीत काय; कोणत्या पक्षाला काय वाटते?
लातूर : कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे निर्बंध उठवताना शासन खबरदारी घेत असून, लाट रोखण्यासाठी जपून पावले उचलत आहे. शासनाचे निर्णय जनतेच्या हिताचे आहेत. त्यामुळेच मंदिरे उघडण्याची घाई केली जात नाही. शासन योग्य ती भूमिका घेत असल्याचे मत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले तर भारतीय जनता पक्षाने सर्वच निर्बंध उठवले आहेत मग मंदिरेच बंद का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
मंदिरे उघडायला हवीत काय? यावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली असता, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या भूमिकेचे समर्थन केले. सध्या शाळा, महाविद्यालये बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. कोरोनाचे संकट असल्यामुळे जगच हैराण आहे. मग मंदिरांचे राजकारण कशासाठी, असा प्रश्न काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षांनी केला. भाजप शहर जिल्हाध्यक्षांनी मंदिरे उघडण्याची भूमिका लावून धरली. सगळेच निर्बंध उठवले आहेत मग मंदिरे बंद कशासाठी, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
कोरोनानंतरच मंदिरे उघडावीत...
कोरोना अद्याप गेलेला नाही. संसर्ग सुरूच आहे. तिसऱ्या लाटेची शक्यताही वर्तवली जात आहे. राज्य शासन योग्य ती भूमिका घेत आहे. त्यामुळे घाई करू नये. शासनाला जनतेची काळजी आहे.
ॲड. श्रीशैल्य उटगे, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
मंदिरांवरून राजकारण करू नये
राज्य शासनाने कोरोनाची परिस्थिती अत्यंत ताकतीने हाताळली आहे. भाजप जातीयवाद निर्माण करण्यासाठी मंदिरे उघडण्यासाठी शंखनाद करत आहे. त्यांना जनतेच्या आरोग्याची काळजी नाही. म्हणूनच त्यांच्याकडून शंखनाद होत आहे.
मकरंद सावे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
कोरोना गेल्यानंतरच मंदिरे उघडावीत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार अत्यंत चांगले निर्णय घेत आहे. कोरोना थोडा कमी झाल्यानंतर काही निर्बंध उठविण्यात आले आहेत. अत्यावश्यक असणाऱ्या सर्व बाबी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे मंदिरे उघडण्याची घाई नको. कोरोना गेलेला नाही.
संतोष सोमवंशी, माजी जिल्हाप्रमुख, शिवसेना
नियमांचे पालन करून परवानगी मिळावी...
कोरोना नियमांचे पालन करून मंदिरे उघडण्यास परवानगी दिली पाहिजे. सध्या सणासुदीचे दिवस आहेत. भाविकांना मंदिरात देवापुढे नतमस्तक झाल्यानंतर थोडे समाधान मिळेल. शिवाय कोरोनाच्या भीतीतून बाहेर पडता येईल. मंदिर परिसरात पूजाअर्चा साहित्य विक्रीचे स्टॉल असतात. त्यांचाही व्यवसाय बंद झालेला आहे. अनेकांची उपजीविका मंदिर परिसरातील उलाढालीवर असते. त्यामुळे कोरोनाविषयक नियमांचे पालन करून मंदिरे उघडण्यास परवानगी मिळावी, अशी अपेक्षा काही विश्वस्तांनी व्यक्त केली.