धार्मिक कार्यक्रमातून ९७ ग्रामस्थ कोरोनाबाधित; प्रशासनाने संपूर्ण गाव केले सील, अत्यावश्यक सेवाही मिळणार घरपोच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 18:15 IST2021-04-09T18:11:03+5:302021-04-09T18:15:07+5:30
लिंबाळवाडी हे बाराशें लोकवस्तीचे गाव आहे. गावातील एका मंदिरात काही दिवसांपूर्वी धार्मिक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.

धार्मिक कार्यक्रमातून ९७ ग्रामस्थ कोरोनाबाधित; प्रशासनाने संपूर्ण गाव केले सील, अत्यावश्यक सेवाही मिळणार घरपोच
- संदीप अंकलकोटे
चाकूर : तालुक्यातील लिंबाळवाडी येथील एका मंदिरात सुरु असलेल्या धार्मिक कार्यक्रमातून संपूर्ण गावात कोरोना संसर्ग झाल्याने खळबळ उडाली आहे. प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून शुक्रवारी आरोग्य विभागाच्या पथकाने पावणे तिनशें ग्रामस्थांची कोरोना चाचणी केली. त्यात ९७ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. गावातील प्रत्येकाची कोरोना तपासणी करण्याची मोहिम आरोग्य विभागाने सुरु केली असून प्रशासनाने गावात १० दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाऊन लागू केला आहे.
लिंबाळवाडी हे बाराशें लोकवस्तीचे गाव आहे. गावातील एका मंदिरात काही दिवसांपूर्वी धार्मिक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मीक कार्यक्रमात गावातील अनेक भाविकांनी सहभाग घेतला होता. दरम्यान, एक ग्रामस्थ कोरोनाबाधित आढळून आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच्या संपर्कातील ९ जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले. यानंतर आरोग्य पथकाने गुरूवारी व शुकवारी पावणे तिनशें ग्रामस्थांची कोरोना तपासणी केली. त्यात तब्बल ९७ ग्रामस्थ पॉझीटीव्ह आढळून आले आहेत. सप्ताहात उपस्थित असलेले सर्व जण कोरोनाबाधित आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, गावातील एक व्यक्ती अंत्यसंस्काराला बाहेरगावी गेला होता. परत आल्यानंतर त्या व्यक्तीच्या संपर्कातूनच कोरोनाची लागण झाल्याचे ग्रामस्थांचे मत आहे. सर्व ग्रामस्थांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी. प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करावे असे आवाहन करून प्रशासनाने ४५ वर्षांच्यावरील ग्रामस्थांना गावातच कोरोना लस द्यावी अशी मागणी सरपंच शरद बिराजदार यांनी केली आहे.
यानंतर तहसीलदार डाॅ.शिवानंद बिडवे, गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे, पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ, तालूका आरोग्य अधिकारी डाॅ.अर्चना पंडगे, वैद्यकिय अधिकारी डॉ श्रीनिवास हासनाळे, जिल्हा परीषद सदस्य धनश्री अर्जुने, सरपंच शरद बिराजदार, तलाठी अविनाश पवार, ग्रामसेविका अपेक्षा पाटील यांनी लिंबाळवाडी गावात जाऊन पाहणी केली. परस्थितीचा आढावा घेतला. कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन जमावबंदी तसेच धार्मीक कार्यक्रमावर जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातलेली असताना सुध्दा गावात सप्ताहाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सर्व ग्रामस्थांची चाचणी केली जाणार
आरोग्य विभागाच्या वतीने वैद्यकिय अधिकारी डॉ.श्रीनिवास हासनाळे व त्यांचे सहकारी असे दहा जणांचे एक पथक येथे गावातील सर्व व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. सर्व ग्रामस्थांची कोरोनाची चाचणी केली जाणार आहे. रुग्ण संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.या रुग्णावर जागीचे उपचार केले जात आहेत.तर काहींनी गृह विलगीकरण तर काही रुग्णांना चाकूर येथील कोरोना केअर सेंटरमध्ये उपचारासाठी पाठविले जाणार आहे.
- डाॅ.अर्चना पंडगे,तालुका आरोग्य अधिकारी
गाव केले सील, अत्यावश्यक सेवा मिळणार घरपोच
रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाच्यावतीने योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. गावातील प्रत्येक व्यक्तीची चाचणी करण्यात येणार आहे. खबरदारी म्हणून दहा दिवसासाठी गावातील कोणीही व्यक्ती बाहेर जाणार नाही अथवा गावात येणार नाही. गाव दहा दिवसासाठी सिल केले आहे. ग्रामस्थांना गृह उपयोगी साहित्य ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घरपोच करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रशासनाकडून वैद्यकिय पथक, आशा आणि अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जात आहे.
- डाॅ. शिवानंद बिडवे, तहसीलदार, चाकूर