शिरूर अनंतपाळ तालुक्यात उन्हाळी हंगामातील मूग बहरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:17 IST2021-04-05T04:17:39+5:302021-04-05T04:17:39+5:30
शिरूर अनंतपाळ तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर आधारित शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, पीक प्रात्यक्षिक घेऊन उत्पादन वृद्धीसाठी ...

शिरूर अनंतपाळ तालुक्यात उन्हाळी हंगामातील मूग बहरला
शिरूर अनंतपाळ तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर आधारित शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, पीक प्रात्यक्षिक घेऊन उत्पादन वृद्धीसाठी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून तिहेरी हंगामातील पिके घेतली जात आहेत. यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांनी उन्हाळी मुगाला पसंती दिली असून, तालुक्यातील दैठणा, शेंद, तळेगाव, तिपराळ, साकोळ, शिरूर अनंतपाळ आदी गावांतील शेतकऱ्यांनी दहा हेक्टरमध्ये उन्हाळी मुगाची पेरणी केली आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामातील मूग चांगलाच बहरला असल्याचे चित्र दिसून येत आहे. पारंपरिक पद्धतीने पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी असली तरी प्रायोगिक तत्त्वावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. पारंपरिक पद्धतीने आजपर्यंत खरीप आणि रबी असे दोन हंगाम घेतले जात होते. परंतु अनेक शेतकऱ्यांनी आता तिसरा हंगाम घेण्यास सुरुवात केली आहे. आणि त्यामध्ये त्यांना चांगले यश, तर मिळत आहे. शिवाय, चांगले उत्पादनही पदरी पडत आहे. यासाठी तालुका कृषी विभागाचे मंडळ अधिकारी बाळासाहेब गाढवे, कृषी अधिकारी शिवप्रसाद वलांडे यानी उन्हाळी हंगाम घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या बांधावर भेट देऊन त्यांना मार्गदर्शन सुरू केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.
तिहेरी हंगामावर अधिक भर...
पारंपरिक पद्धतीने शेती करून आजपर्यंत केवळ खरीप आणि रबी असे दोनच हंगाम घेतले जात होते. परंतु ज्या शेतकऱ्यांना पाण्याची सोय आहे. असे शेतकरी आता तिहेरी हंगाम घेत असून, यंदा प्रायोगिक तत्त्वावर आधारित दहा हेक्टर्समध्ये मुगाची, तर २५ हेक्टर्समध्ये भुईमुगाची लागवड केली आहे. त्यामुळे त्यांच्या पदरी कमी खर्चात अधिक उत्पादन पडणार आहे.
हेक्टरी दहा क्विंटल उत्पादन मिळेल...
उन्हाळी हंगामातील मूग आणि भुईमूग पिकाचे उत्पादन घेणाऱ्या तालुक्यातील दैठणा येथील शेतकरी रमेश पाटील, मेजर दिलीप बिरादार, रवी पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले खरीप आणि रबी हंगामातील पिकावर विविध प्रकारच्या किडीचा प्रादुर्भाव होतो. परंतु, उन्हाळी हंगामातील मूग तसेच भुईमुगाचा हेक्टरी दहा ते बारा क्विंटलचा उतारा मिळेल असे सांगितले.
फाेटाे ओळी
उन्हाळी मूग बहरला...
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील दैठणा येथील शेतकरी रमेश पाटील यांच्या शेतातील उन्हाळी मूग बहरला आहे.