कारवाई न करताच रिकाम्या हाताने परतण्याची पथकावर नामुष्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:19 IST2021-03-25T04:19:44+5:302021-03-25T04:19:44+5:30
अहमदपूर तालुक्यातील माण्यड नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर वाळूचा उपसा होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. याप्रकरणी तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ...

कारवाई न करताच रिकाम्या हाताने परतण्याची पथकावर नामुष्की
अहमदपूर तालुक्यातील माण्यड नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर वाळूचा उपसा होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. याप्रकरणी तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पथकाची नियुक्ती करण्यात आली. वाळूमाफियांवर कारवाई करण्यासाठी नियोजन करण्यात आले होते. पथकात एक नायब तहसीलदार, दोन तलाठी, वाहनचालकांचा समावेश हाेता. त्यानुसार मंगळवारी रात्री तहसीलमधून निघालेल्या तहसील कार्यालयाचे वाहन वाळूमाफियाचा पाठलाग करताना अचानक नदीपात्रात बंद पडले. सदरची घटना काजळ हिप्परगा परिसरात घडली. यामुळे पथकातील कर्मचाऱ्यांत एकच खळबळ उडाली. वाहन काही सुरू होईना, त्यातच समोर वाळूमाफियांकडून वाळूचा उपसा सुरूच असल्याचे चित्र पाहून पथकातील कर्मचारी हतबल झाले. कसेतरी नदीपात्रातील कर्मचारी रस्त्यावर आले. त्यानंतर रिकाम्या हाताने कारवाई न करताच अहमदपूर मुख्यालय गाठले. केवळ वाहन व्यवस्थित नसल्याने रिकाम्या हाताने परतण्याची नामुष्की पथकावर ओढावली आहे. महसूलच्या पथकाकडे नवीन वाहन नसल्याने वाळूमाफियांवर कारवाई करण्यामध्ये अडथळे येत आहेत.
६० लाखांचा दंड केला वसूल...
अहमदपूर येथील महसूल विभागाच्या पथकाने गत वर्षभरात ६० लाखांचा दंड वसूल करीत १८ वाहनधारकांवर कारवाई केली असल्याचे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले. सदरची कारवाई सुरूच राहणार आहे. अवैध मार्गाने वाळूचा हाेणारा उपसा थांबविण्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले आहे. या पथकाकडून ठिकठिकाणी कारवाई केली जाणार आहे, असेही ते म्हणाले.