कोरोना रुग्णांवर उपचार करणारे सव्वाशे कर्मचारी कार्यमुक्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:42 IST2021-09-02T04:42:25+5:302021-09-02T04:42:25+5:30

लातूर : कोरोना काळात रुग्णांवर उपचार करणाऱ्या तब्बल सव्वाशे कंत्राटी कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कार्यमुक्त करण्यात आले आहे. ३१ ऑगस्टपूर्वी या ...

Seven hundred workers on corona patients laid off! | कोरोना रुग्णांवर उपचार करणारे सव्वाशे कर्मचारी कार्यमुक्त !

कोरोना रुग्णांवर उपचार करणारे सव्वाशे कर्मचारी कार्यमुक्त !

लातूर : कोरोना काळात रुग्णांवर उपचार करणाऱ्या तब्बल सव्वाशे कंत्राटी कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कार्यमुक्त करण्यात आले आहे. ३१ ऑगस्टपूर्वी या सर्व कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करावे, असे निर्देश आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर आता बेरोजगारीची वेळ आली आहे. दरम्यान, संभाव्य तिसरी लाट येणार असल्याची शक्यता वर्तविली जात असताना आम्हाला का कार्यमुक्त केले जात आहे, असा सवालही या कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

गेल्या दीड वर्षापासून बहुतांश शासकीय रुग्णालये तसेच कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना रुग्णांवर कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून उपचार केले जात होते. उदगीर, लातूर तसेच वेगवेगळ्या कोविड केअर सेंटरमध्ये मेडिकल ऑफिसर, स्टाफनर्स, वॉर्डबॉय, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट आदी पदांवर कंत्राटी कर्मचारी कार्यरत होते. परंतु, या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय आरोग्य मिशनमधून मानधन मिळणार नाही. त्यामुळे ३१ ऑगस्टपूर्वी सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात यावे, असे आदेश वरिष्ठ कार्यालयाने दिले आहेत. या आदेशामुळे जिल्ह्यात वेगवेगळ्या कोविड केअर सेंटरमधील सव्वाशे कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केले जाणार आहे. लातूर मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये सद्यस्थितीत २६ कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. त्यात सहा वैद्यकीय अधिकारी, १२ स्टाफनर्स, पाच वॉर्डबॉय, एक टेक्निशियन, एक फार्मासिस्ट व एक डीईओ असे २६ कर्मचारी आहेत. या सर्वांना कार्यमुक्तीचे आदेश आले आहेत. संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात असताना आम्हाला कार्यमुक्त का केले जात आहे, असा प्रश्न महानगरपालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या अनेक कंत्राटी कर्मचाऱ्यांनी या प्रतिनिधीशी बोलताना उपस्थित केला.

आपत्ती व्यवस्थापनमधून निधी उपलब्ध

संभाव्य तिसरी लाट आली तर मनुष्यबळाची गरज लागणार आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेत मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनमधून पैसे उपलब्ध करून द्यावेत, असा प्रस्ताव जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आला असल्याचे समजते.

वरिष्ठ कार्यालयाकडून कार्यमुक्त करण्याचे आदेश आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील वेगवेगळ्या कोविड केअर सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना ३१ ऑगस्टपर्यंत कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्थानिक पातळीवरचा हा निर्णय नाही. - डॉ.एल.एस. देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक

मनपाकडे आता एकच कोविड केअर सेंटर

महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाअंतर्गत सध्या पूरणमल लाहोटी तंत्रनिकेतनमध्ये एक कोविड केअर सेंटर सुरू आहे. त्यामध्ये ३७ कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. आमच्याकडीलही कंत्राटी कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश आहेत. आता या कोविड केअर सेंटरमध्ये मनपाच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना नियुक्त केले जाणार आहे. - डॉ. माले, आरोग्याधिकारी, मनपा

Web Title: Seven hundred workers on corona patients laid off!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.