लातूर शहरातील भाजी मार्केट बाह्यवळण रस्त्यावर स्थलांतरित करण्याबाबत संबंधित व्यापाऱ्यांनी केलेली मागणी, यामध्ये असलेली मतमतांतरे त्याचबरोबर बाह्यवळण रस्त्यावरील जागेत सध्या सुरू असलेला कडबा, जनावरांचा बाजार यासंदर्भाने असलेली कृषी उत्पन्न बाजार समितीची भूमिका, शिवाय हे भाजी मार्केट स्थलांतरित करायचे ठरले तर नवीन ठिकाणी उभाराव्या लागणाऱ्या सुविधा याबाबींचा अभ्यास करून निर्णय घेण्यासाठी पालकमंत्री अमित देशमुख यांच्या सूचनेवरून बाजार समिती संचालक मंडळातील ज्येष्ठ सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. सदरील समिती सदस्यांसोबत शुक्रवारी पालकमंत्री देशमुख यांनी मंत्रालयातून ऑनलाइन आढावा बैठक घेतली.
बैठकीस बाजार समितीचे सभापती ललितभाई शहा, उपसभापती मनोज पाटील, संचालक सुधीर गोजमगुंडे, विक्रम शिंदे, रावसाहेब पाटील, गोविंद नरहरे, भास्कर शिंदे, बिदादा यांच्यासह संबंधित अधिकारी सहभागी झाले होते.