लातूरच्या महेश उगिलेच्या खेळीने सेना दल चॅम्पियन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:20 IST2021-04-09T04:20:16+5:302021-04-09T04:20:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : राईट बॅक पोझिशनवर खेळत उत्कृष्ट जम्पशूटचे प्रदर्शन घडवीत लातूरच्या महेश उगिलेने हँडबॉल खेळात पुन्हा ...

लातूरच्या महेश उगिलेच्या खेळीने सेना दल चॅम्पियन
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : राईट बॅक पोझिशनवर खेळत उत्कृष्ट जम्पशूटचे प्रदर्शन घडवीत लातूरच्या महेश उगिलेने हँडबॉल खेळात पुन्हा छाप सोडली आहे. त्याच्या कामगिरीच्या जोरावर सेना दलाच्या संघाने स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे. त्यामुळे लातूरचा महेश पुन्हा चमकला आहे.
भारतीय हँडबॉल फेडरेशनच्या वतीने मध्य प्रदेश येथील इंदौर येथे झालेल्या सिनियर नॅशनल चॅम्पियनशीप स्पर्धेत सेना दलाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या लातूरच्या महेश उगिलेने आपल्या खेळीच्या जोरावर संघास विजेतेपदाचा बहुमान पटकावून दिला आहे. अंतिम सामन्यात दिल्ली संघाचा ३३ - २८ असा ५ गोलने पराभव करीत विजेतेपद पटकावून दिले. त्यात महेश उगिलेच्या ७ गोलचा समावेश होता. तत्पूर्वी लीग स्पर्धेत पश्चिम बंगाल व तेलंगणाचा सेना दलाच्या संघाने पराभव केला. उप-उपान्त्यपूर्व सामन्यात जम्मू काश्मीरचा, उपान्त्यपूर्व सामन्यात गतविजेत्या पंजाबचा, तर उपान्त्य सामन्यात मध्य प्रदेशचा पराभव केला. या सर्व सामन्यात महेश उगिलेचे गोल विजयासाठी निर्णायक ठरले. अंतिम सामन्यात या संघाने दिल्लीचा ५ गोलने पराभव करीत विजेतेपदावर कब्जा केला. सेना दलाच्या संघात वायू सेना, थल सेना व नवसेनाच्या खेळाडूंचा समावेश असतो. सेना दलाचे प्रतिनिधीत्व महेशची खेळी विजेतेपद मिळवून देणारी ठरली. एकंदरीत, या स्पर्धेत महेश उगिलेने एकूण ४० गोल करीत आपल्या संघास विजेतेपद पटकावून दिले. त्याला लातूरचे प्रशिक्षक सुनील सुरकुटे, एअर फोर्सचे प्रशिक्षक अर्जुनसिंग शेखावत यांचे मार्गदर्शन लाभले. महेश उगिलेच्या या खेळीचे क्रीडा क्षेत्रातून स्वागत होत आहे.
पाकिस्तानला हरविल्यानंतर आला होता चर्चेत...
सन २०१६मध्ये साऊथ एशियन स्पर्धेत पाकिस्तानला हरवून महेशने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते. त्यावेळेपासून तो चर्चेत आला होता. आजतागायत त्याने नऊ वेळेस राष्ट्रीय स्पर्धेत, पाच वेळेस फेडरेशन कप स्पर्धेत, तर सहा वेळेस आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. चंदीगड येथे ज्युनिअर वॉरंट ऑफिसर म्हणून कार्यरत असलेला महेश उगिले आठ वर्षांपासून सेना दलाकडून खेळतो. त्याने आजतागायत आपल्या संघास चार वेळेस सुवर्णपदक, तर तीन वेळेस रौप्यपदक मिळवून दिले आहे.
संघास विजय मिळवून दिल्याचा आनंद...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संघाचे सराव शिबिर अत्यंत अल्प कालावधीचे झाले. ज्यामुळे सरावाला जास्त वेळ मिळाला नाही. तरीही माझ्यासह सर्व खेळाडूंच्या कामगिरीच्या जोरावर संघाने विजेतेपद पटकावले. याचा आनंद आहे. पुढील होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तयारी चालू असून, भारतीय संघास या स्पर्धेत विजेतेपद मिळवून देण्याचा मानस असल्याचे आंतरराष्ट्रीय हँडबॉलपटू महेश उगिलेने ‘लोकमत’ला सांगितले.