दुसऱ्या लाटेत ८१ गावांपर्यंत कोरोनाचा संसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:20 IST2021-05-06T04:20:43+5:302021-05-06T04:20:43+5:30
उदगीर : कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी प्रशासन व नागरिकांनी वेळीच खबरदारी घेतल्याने तालुक्यातील ६४ गावांपर्यंत कोरोनाचा संसर्ग पसरला होता. मात्र, ...

दुसऱ्या लाटेत ८१ गावांपर्यंत कोरोनाचा संसर्ग
उदगीर : कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी प्रशासन व नागरिकांनी वेळीच खबरदारी घेतल्याने तालुक्यातील ६४ गावांपर्यंत कोरोनाचा संसर्ग पसरला होता. मात्र, मध्यंतरी संसर्ग कमी झाल्याने शहरासह ग्रामीण भागातील नागरिक बिनधास्त झाले. दरम्यान, दुसऱ्या लाटेत तालुक्यातील ८१ गावांपर्यंत कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
पहिल्या लाटेत कोरोनाची लक्षणे व फैलाव कमी होता. तसेच गावागावांत जनजागृती करण्यात आली होती. नागरिकांत भीतीचे वातावरण होते. त्यामुळे नागरिकांकडून स्वयंस्फूर्तीने नियमांचे पालन झाले. पहिली लाट ओसरताच ढील मिळाली आणि नियमांचे उल्लंघन सुरु झाले. मास्क, सॅनिटायझर व फिजिकल डिस्टन्सकडे दुर्लक्ष करीत विवाह समारंभ सुरु झाले. गर्दीमुळे दुसऱ्या लाटेत संसर्ग वाढला.
शहरासह तालुक्यातील ८१ गावांत बाधित आढळले आहेत. नळगीर, अवलकोंडा, देऊळवाडी, नागलगाव, कौळखेड, तोंडचिर, हंडरगुळी, हाळी, तोंडार, वाढवणा खु., सुकणी, हंगरगा, मोर्तळवाडी, हेर, लोणी, मलकापूर, लोहारा, वाढवणा बुद्रूक, गुडसूर, एकुर्का रोड, डोंगरशेळकी, सोमनाथपूर आदी २२ मोठ्या गावात संसर्ग पोहोचला.
१४ गावे कोरोनापासून दूर...
तालुक्यातील वागदरी, बॉर्डर तांडा, गायमाय तांडा, वंजारवाडी, आडोळवाडी, करलेवाडी, गणेशवाडी, कुंभारवाडी, भाकसखेडा प., होनी हिप्परगा, पीरतांडा, आडोळ तांडा, अनुपवाडी आदी १४ गावांनी कोरोना संसर्ग रोखण्यात सध्या यश मिळविले आहे. दरम्यान, आठवडाभरापासून बाधितांची संख्या कमी झाली आहे.
कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढविले...
तालुक्यात पहिली लाट ६४ गावांपर्यंत पोहोचली होती. दुसऱ्या लाटेत ८१ गावांपर्यंत कोरोनाचा संसर्ग पसरला आहे. प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. ग्रामीण भागात कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. जाणीव जागृती, लसीकरण प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी घरीच राहून सहकार्य करावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत कापसे यांनी केले.
लक्षणे जाणवताच उपचार घ्यावेत...
पोलीस, महसूल, पालिका, आरोग्य कर्मचारी व ग्रामपंचायत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आहे. नागरिकांकडून सहकार्य अपेक्षित आहे. विनाकारण रस्त्यावर फिरू नये. मास्क, सॅनिटायझर व फिजिकल डिस्टन्स या नियमांचे काटेकोर पालन करावे. सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी अशी लक्षणे जाणवत असल्यास तत्काळ नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी, असे तहसीलदार रामेश्वर गोरे म्हणाले.
नागरिकांनी काळजी घ्यावी...
कोरोनाची पहिली लाट ओसरताच नागरिकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर कमी केला. लग्न व इतर कार्यक्रमात गर्दी होऊ लागली. त्यामुळे संसर्ग वाढला असल्याचे वाढवणा बुद्रूक येथील सरपंच नागेश थोंटे यांनी सांगितले.