अहमदपूर तालुक्यातील म्हाडा वसाहतीसाठी जागेचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:18 IST2021-03-15T04:18:30+5:302021-03-15T04:18:30+5:30
सर्वसामान्य कुटुंबांना परवडेल अशा पद्धतीची घरे उपलब्ध करून देण्याची म्हाडाची योजना आहे. अहमदपूर येथील मरशिवणी शिवारातील सहा हेक्टर गायरान ...

अहमदपूर तालुक्यातील म्हाडा वसाहतीसाठी जागेचा शोध
सर्वसामान्य कुटुंबांना परवडेल अशा पद्धतीची घरे उपलब्ध करून देण्याची म्हाडाची योजना आहे. अहमदपूर येथील मरशिवणी शिवारातील सहा हेक्टर गायरान जागेची पाहणी उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, तलाठी माधव जोशी यांनी केली. यावेळी म्हाडाचे शाखा अभियंता रमेश बिराजदार, हरिदास देशमुख उपस्थित होते. या जागेबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रलंबित असून, हा प्रस्ताव मंजूर होताच सर्वसामान्यांना राहण्यासाठी सवलतीच्या दरात एक हजार २०० घरे उपलब्ध होणार आहेत. ही योजना टप्प्या-टप्प्यामध्ये राबविण्यात येणार असून, आर्थिक गरजेनुसार घराचे बांधकाम करण्यात येणार असल्याचे म्हाडाच्या वतीने सांगण्यात आले. त्याचबराेबर अहमदपूर नगर परिषदेच्या विकास आराखड्यात म्हाडासाठी जागा आरक्षित करण्यात आली आहे. त्याच्यासाठी भूसंपादनाची प्रक्रियाही काही दिवसांत होणार असल्याचे सांगण्यात आले. मरशिवणी येथील सहा हेक्टर जागेवर उभारण्यात येणाऱ्या म्हाडाच्या वसाहतीतून तब्बल एक हजार २०० कुटुंबांना स्वस्तातील, परवडेल अशा रकमेत हक्काचा निवारा मिळणार आहे.
वसाहतीसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू...
अहमदपूर शहरालगत असलेल्या मरशिवणी येथील गायरानावर म्हाडाची वसाहत उभारली जाणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत भूसंपादनाची कारवाई करण्यात येत आहे. जागा उपलब्ध होताच म्हाडाची वसाहत उभारण्यासाठी लागणारा आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्याचबराेबर अहमदपूरच्या विकास आराखड्यातील नियोजित जागेच्या भूसंपादनाची प्रक्रियाही काही दिवसांत राबविली जाणार आहे, असे म्हाडाचे उपविभागीय अभियंता माधव अटकळे म्हणाले. म्हाडा वसाहतीसाठी सहा हेक्टर जागेची मागणी करण्यात आली असून, मरशिवणी शिवारातील जागेची पाहणी करण्यात आली आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे, म्हाडाचे अधिकारी उपस्थित होते. त्यांच्या मागणीप्रमाणे जिल्हाधिकारी यांच्या पत्रानुसार ही कारवाई करण्यात येणार आहे, असे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी म्हणाले.