शाळाबाह्य मुलांसाठी आजपासून शोधमोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:22 IST2021-03-01T04:22:46+5:302021-03-01T04:22:46+5:30
शासनाच्या आदेशानुसार दरवर्षी ३० दिवसांपेक्षा जास्त दिवस शाळेत गैरहजर राहणाऱ्या मुलांना शाळाबाह्य गृहीत धरण्यात येऊन शिक्षक, बालरक्षकांमार्फत शोधमोहीम राबविण्यात ...

शाळाबाह्य मुलांसाठी आजपासून शोधमोहीम
शासनाच्या आदेशानुसार दरवर्षी ३० दिवसांपेक्षा जास्त दिवस शाळेत गैरहजर राहणाऱ्या मुलांना शाळाबाह्य गृहीत धरण्यात येऊन शिक्षक, बालरक्षकांमार्फत शोधमोहीम राबविण्यात येते. परंतु, कोरोनाच्या संकटामुळे शहरातील अनेक कुटुंबांनी आपले गाव जवळ केले आहे. स्थलांतरामुळे शाळाबाह्य मुलांचे प्रमाणही वाढले आहे. प्रत्येक जिल्ह्यातील अशा शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने शोधमोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार १ ते १० मार्च या कालावधीत हा सर्वे होणार आहे.
या सर्वेक्षणाची जबाबदारी शिक्षकांवर सोपविण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गाेयल आणि शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांनी गटशिक्षणधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत सूचना केल्या आहेत. दरम्यान, उपशिक्षणाधिकारी विशाल दशवंत यांनी कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन केले. कार्यशाळेस डायट प्राचार्य अनिल मुरकुटे, डॉ. भागिरथी गिरी, आर. एन. गिरी, बालरक्षक समन्वयक सी. बी. ठाकरे, सतीश भापकर, रजिया शेख, दत्तात्रय माळकर, आर. एन. सूर्यवंशी, विवेक सौताडेकर आदी होते.
१० दिवसांत घेतला जाणार शोध...
सदरील सर्वेक्षण गावातील बसस्थानक, रेल्वेस्थानक, झोपडपट्ट्या, वीटभट्ट्या, दगडखाणी, फुटपाथ, हॉटेल तसेच विविध बालमजूर ठिकाणावर करण्यात येणार आहे. एकही शाळाबाह्य मूल या सर्वेक्षणापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केल्या आहेत. १० दिवस ही मोहीम सुरु राहणार आहे.