कोरोना नियमांचे उल्लंघन करणारे पाच दुकाने सील; मालकांकडून ५३ हजारांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 16:31 IST2021-04-21T16:31:19+5:302021-04-21T16:31:43+5:30
corona virus आयुक्तांनी रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची विचारणा करुन, त्यांनाही दंड ठाेठावला आहे.

कोरोना नियमांचे उल्लंघन करणारे पाच दुकाने सील; मालकांकडून ५३ हजारांचा दंड वसूल
लातूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी लातूर शहरातील पाच दुकानदारांकडून ५३ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच महानगरपालिकेच्या पथकाकडून सदरची दुकाने सील करण्यात आली आहेत.
लातूर शहरातील गोलाई परिसरात लातूर महानगर पालिकेचे आयुक्त अमन मित्तल यांनी पाहणी केली. दरम्यान, गोलाई परिसरात काही दुकाने उघडी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आली. यावेळी काेराेनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेले कडक निर्बंध आणि नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळले. मनपा आयुक्त मित्तल यांनी पथकाला पाचारण करुन कारवाईचे आदेश दिले. यामध्ये दाेन शूज दुकान, कामपड दुकान, हाेलसेल काड दुकान, साडी सेंटरला प्रत्येकी दहा हजारांचा दंड करण्यात आला. शिवाय, ही पाचही दुकाने मनपाच्या पथकाने सील केली आहेत. तर आयुक्तांनी रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची विचारणा करुन, त्यांनाही दंड ठाेठावला आहे. यावेळी मनपाच्या झाेड डीचे क्षेत्रीय अधिकारी बंडू किसवे, अमजद शेख, हिरालाल शेख, नितीन घाेडके, काेठवाड, रवी कांबळे, धाेंडिराम साेनवणे, प्रदीप गायकवाड यांच्यासह कर्मचाऱ्यांची उपस्थिती हाेती.
मनपाच्या पथकाची करडी नजर...
लातूर शहरात सध्याला अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने, व्यवहार बंद आहेत. याबाबत शासन, प्रशासनाच्या वतीने निर्बंध आणि नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नियमांच्या अंमलबजावणीसाठी मनपाचे आयुक्त अमन मित्तल आणि विविध पथके कार्यरत आहेत. आयुक्त मित्तल हे स्वत: लातूर शहरात फिरुन परिस्थितीचा दरराेज आढावा घेत आहेत. गोलाई परिसरात काही दुकानदार आपली दुकाने उघडी ठेवत व्यवहार करत असल्याचे दिसून आले. दरम्यान, त्यांनी संबंधित दुकानदारांना दंड करुन दुकानच सील केले आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. त्याचबरेाबर दुकानदारांनी काेराेनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मनपा पथकाची करडी नजर आहे.