कोविडमुळे दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम जाणवत आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने शासनाने इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग नियमांचे पालन करून १५ जुलैपासून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, शाळा सुरू करण्यास ग्रामपंचायतीचा ठराव, पालकांची परवानगी व त्या गावांतील कोरोनाची स्थिती याचा आढावा घेऊन शाळा सुरू होणार आहेत.
हंडरगुळी येथे तीन माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आहेत. शिवाय, परिसरातील काही गावांतील विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. त्यामुळे विद्यार्थी संख्या चांगली आहे. सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच विजय अंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन शासन नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला. शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षकांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. हा ठराव गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठविला जाणार असून, त्यांच्या परवानगीनंतर शाळा सुरू होतील, असे केंद्रप्रमुखांनी सांगितले.
बैठकीस केंद्रप्रमुख काशीम शेख, उपसरपंच बालाजी भोसले, ग्रामविकास अधिकारी एस. आर. कांबळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. आकाश पवार, तलाठी कुलदीप गायकवाड, प्राचार्य एन. बी. हाके, मुख्याध्यापिका सुनीता काळे, मुख्याध्यापक वाजीद शेख, आदी उपस्थित होते.