राजकुमार जाेंधळे, उदगीर (जि. लातूर) : चाॅकलेट घेण्यासाठी दुकानात आलेल्या शाळकरी मुलीवर तुकाराम गोविंदराव जाधव (वय ६५) याने अत्याचार केल्याची घटना उदगीर तालुक्यातील एका गावात २०१७ मध्ये घडली हाेती. दरम्यान, या खटल्यात दाेषी ठरलेल्या आराेपीला उदगीर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर.एम. कदम यांनी गुरुवारी जन्मठेप व २५ हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली.
आरोपी तुकाराम गोविंदराव जाधव यांने ८ डिसेंबर २०१७ रोजी एक अल्पवयीन मुलगी चाॅकलेट घेण्यासाठी किराणा दुकानात आली हाेती. दरम्यान, आरोपीने पीडित मुलीला घरात नेऊन अत्याचार केला. याबाबत पीडीतेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात १० डिसेंबर २०१७ रोजी बाललैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल केला हाेता. याचा तपास पोउपनि. विद्या जाधव यांनी केला. त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. साक्षीदारांचा जबाब नोंदवला. तपास पूर्ण करुन आराेपीविराेधात उदगीर न्यायालयात दाेषाराेपपत्र दाखल केले. या खटल्याची सुनावणी उदगीर जिल्हा व सत्र न्यायालयात झाली.
न्यायालयात झाली दहा जणांची साक्ष...
सुनावणीदरम्यान सरकार पक्षाच्या वतीने एकूण दहा साक्षीदारांची साक्ष नाेंदविण्यात आली. तर बचाव पक्षाच्या वतीने एकाची साक्ष नोंदविण्यात आली. सहाय्यक सरकारी वकील अॅड. शिवकुमार गिरवलकर यांनी युक्तीवाद केला. सबळ पुराव्याच्या आधारे दाेषी ठरलेला आराेपी तुकाराम गाेविंदराव जाधव याला उदगीरच्या न्यायालयाने गुरूवारी जन्मठेप व २५ हजारांच्या दंडाची शिक्षा ठाेठावली. दंड न भरल्यास आरोपीला सहा महिन्यांच्या सक्तमजुरीचीही शिक्षा सुनावली. या खाटल्यात कोर्टपैरवी पोहेकाॅ. अक्रम शेख यांनी केली.