शिष्यवृत्तीची परीक्षा होऊ शकते, मग शाळेची का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:17 IST2021-04-12T04:17:47+5:302021-04-12T04:17:47+5:30

संदीप शिंदे लातूर : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे, तर पहिली ते ...

Scholarship exams can happen, so why not school? | शिष्यवृत्तीची परीक्षा होऊ शकते, मग शाळेची का नाही?

शिष्यवृत्तीची परीक्षा होऊ शकते, मग शाळेची का नाही?

संदीप शिंदे

लातूर : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे, तर पहिली ते आठवी आणि नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. एकीकडे शिष्यवृत्ती परीक्षा कोरोनाच्या नियमांचे पालन करीत होणार असून, इतर वर्गांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षा होऊ शकते, शाळेची परीक्षा रद्द करण्याऐवजी ऑनलाइन पद्धतीने तरी घ्यावी, अशी मागणी पालक, विद्यार्थ्यांमधून होत आहे.

जिल्ह्यात पहिली ते आठवी आणि नववी, अकरावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या ४ लाख १८ हजार ९९४ आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या वर्गांतील विद्यार्थ्यांना पुढील इयत्तेत प्रवेश दिला जाणार आहे, तर दुसरीकडे शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. गेल्या वर्षभरापासून विद्यार्थी परीक्षेचा अभ्यास करत आहेत. मात्र, शिक्षण विभागाने परीक्षा न घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालकांतून ऑनलाइन परीक्षा घेण्याचा सूर उमटत आहे. जिल्ह्यात पहिलीचे ४७ हजार ७७८, दुसरी ४६ हजार ६६१, तिसरी ४६ हजार ६२१, चौथी ४६ हजार २२, पाचवी ४७ हजार ६९९, सहावी ४८ हजार ४८८, सातवी ४९ हजार ६३७, आठवी ४९ हजार २९३, नववी ४८ हजार ४६५ तर अकरावीची ३४ हजार ३५२ विद्यार्थी संख्या आहे. परीक्षा न घेता या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. काही पालकांतून या निर्णयाचे स्वागत होत असून, काहींनी नाराजी व्यक्त केली आहे.

शिक्षणतज्ज्ञ म्हणतात...

इयत्ता १ ते ८ वीचे विद्यार्थी सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आरटीई २००९ नुसार सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमान करून वर्गन्नती करणे व जी मुले अभ्यासात मागे आहेत, त्यांना पुन्हा अध्यापन करून इतर मुलांसोबत आणणे अपेक्षित आहे. इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही एकूण संख्येच्या प्रमाणात अत्यल्प असते. त्यामुळे कोविड १९ च्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करून शिष्यवृत्ती परीक्षा प्रत्यक्ष घेण्यास काहीही हरकत नाही. - सतीश सातपुते

परीक्षा घेण्यामागचा मूळ उद्देश हा विद्यार्थ्यांनी त्या शैक्षणिक वर्षातील अपेक्षित क्षमता कितपत अवगत केल्या आहेत हे जाणून घेणे हा होय. परीक्षा झाल्या किंवा नाही हे महत्त्वाचे नाही तर सध्याची भयंकर अशी कोरोनाची परिस्थिती पाहता व जवळपास वर्षभर शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थी हा कोणत्या स्तरावर आहे व परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर कोणते अध्ययन अनुभव त्यांना आवश्यक आहे हे ठरविण्यासाठी कमीत कमी ऑनलाइन पद्धतीने तरी परीक्षा होणे गरजेचे आहे. त्यामुळे पुढची अध्ययनाची नीती ठरविण्यास शिक्षकांना मदत होईल. नागेश लोहारे

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. परीक्षा ही केवळ ज्ञान व आकलनावर आधारित असतात. पण इतर अनेक कौशल्ये असे आहेत की, परीक्षेशिवाय तपासता येतात. क्रिएटिव्हिटी, संप्रेषण, सहकार्य, आत्मविश्वास, उपयोजन, कौशल्य या बाबी विद्यार्थ्यांसाठी परिपूर्ण असतात. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मोजकेच विद्यार्थी असतात. त्यामुळे इतर वर्गाची आणि शिष्यवृत्ती परीक्षेची तुलना करणे योग्य नाही. - प्रभाकर हिप्परगे

पालक म्हणतात...

गेल्या वर्षभरापासून शाळा बंद आहेत. ऑनलाइन अभ्यास सुरू असला तरी सध्या कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. या काळात मुलांना परीक्षेसाठी पाठविणे धोकादायक आहे. त्यामुळे पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय योग्य असून, या निर्णयाचे मी स्वागत करतो. मुलांचे नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यास हरकत नाही. माधव रासुरे, पालक

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जात आहे, तर दुसरीकडे इतर वर्गाच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचा पर्याय आहे. विद्यार्थ्यांनी वर्षभर ऑनलाइन वर्गाला उपस्थिती दर्शविली आहे. त्यामुळे ऑनलाइन परीक्षेच्या पर्यायाचा विचार करायला हवा.

-विजय सोनवणे, पालक

वर्ग विद्यार्थी संख्या

पहिली ४७,७७८

दुसरी ४६,६६१

तिसरी ४६,६२१

चौथी ४६,०२२

पाचवी ४७,६९९

सहावी ४८,४८८

सातवी ४९,६३७

आठवी ४९,२९३

नववी ४८,४६५

अकरावी ३४,३५२

Web Title: Scholarship exams can happen, so why not school?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.