ग्रामपंचायतीला मंदिर समजून सरपंचांनी कार्य करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:24 IST2021-02-05T06:24:32+5:302021-02-05T06:24:32+5:30

औसा : सरपंचांमुळेच देशाचा विकास होऊ शकतो. चांगल्या ठरावाव्दारे आपण गावाचा विकास करु शकतो. आमदार, खासदारांना काम करणे सोपे ...

The sarpanch should consider the gram panchayat as a temple | ग्रामपंचायतीला मंदिर समजून सरपंचांनी कार्य करावे

ग्रामपंचायतीला मंदिर समजून सरपंचांनी कार्य करावे

औसा : सरपंचांमुळेच देशाचा विकास होऊ शकतो. चांगल्या ठरावाव्दारे आपण गावाचा विकास करु शकतो. आमदार, खासदारांना काम करणे सोपे असते. परंतु, एखाद्या सरपंचासाठी गावकी सांभाळणे हे अवघड काम आहे. आपण आपल्या गावाच्या कल्याणासाठी ग्रामपंचायतीला पवित्र मंदिर समजून काम करण्याची वृत्ती सरपंचांनी आत्मसात करावी, असे प्रतिपादन आदर्श पाटोदा गावचे माजी सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी केले.

आमदार अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून व क्रिएटिव्ह फाऊंडेशनच्या सौजन्याने आयोजित औसा विधानसभा मतदार संघातील नवनिर्वाचित सदस्यांची कार्यशाळा व सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी आमदार अभिमन्यू पवार, भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, ज्येष्ठ नेते सुशीलदादा बाजपाई, ॲड. मुक्तेश्वर वागदरे, ॲड. अरविंद कुलकर्णी, क्रिएटिव्ह फाऊंडेशनचे अध्यक्ष श्रीराम पाटील, सचिव सुहास पाचपुते, प्रा. भीमाशंकर राचट्टे, काकासाहेब मोरे, सुनील उटगे, संतोष मुक्ता, ज्ञानेश्वर वाकडे, जिलानी बागवान, संजय कुलकर्णी, सरपंच संघटनेच्या अध्यक्षा सुकेशना जाधव, कल्पना डांंगे, दीपक चाबुकस्वार आदी उपस्थित होते.

पेरे पाटील म्हणाले, आमदार अभिमन्यू पवार यांनी मनरेगा अंतर्गत शेतरस्ते, गोठे यासह विविध विकासकामांचा ग्रामपंचायत स्तरावर हाती घेतलेला महत्वाकांक्षी कार्यक्रम हा अत्यंत चांगला असून, शेतरस्ता कामात आपला निधी वळवत ग्रामीण भागातील विकास साध्य करण्याचा त्यांचा पॅटर्न आगामी काळात सर्वांनाच फायदेशीर ठरणारा आहे.

ग्रामीण उन्नतीसाठी शेतरस्ते आवश्यक...

आमदार अभिमन्यू पवार म्हणाले, गावाच्या विकासासाठी आमदार, खासदारांची नव्हे तर विकास कृती आराखड्याची आवश्यकता आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी शेतीला जोडधंद्याची गरज आहे. त्यामुळे सुरुवातीला मी कार्यशाळा घेऊन नगदी पीक म्हणून तुती लागवड करण्याचे आवाहन केले होते. मतदार संघातील ६०० शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. पण या संदर्भातील यंत्रणा कुचकामी असल्याने ही योजना कृषी विभागाला जोडावी, अशी मागणी शासनाकडे केली आहे. लवकरच याबाबतचा निर्णय होईल. माझ्या प्रयत्नांमुळे तुतीला शेती पिकाचा दर्जा मिळाला आहे. ग्रामीण आर्थिक उन्नतीसाठी शेतरस्ते आवश्यक असून, माझा तीन वर्षांचा आमदार निधी शेतरस्ते विकासासाठी प्रस्तावित केला आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ८४० किलोमीटरचे शेतरस्त्यांचे प्रस्ताव मंजुरीसाठी दिले आहेत.

Web Title: The sarpanch should consider the gram panchayat as a temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.