ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिकाच सलाइनवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:18 IST2021-03-28T04:18:44+5:302021-03-28T04:18:44+5:30
उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना प्रवासासह आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. खासगी रुग्णालयातील उपचार परवडत नसल्याने या परिसरातील बहुतांश ...

ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिकाच सलाइनवर
उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना प्रवासासह आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
खासगी रुग्णालयातील उपचार परवडत नसल्याने या परिसरातील बहुतांश रुग्ण उपचार मिळतील या अपेक्षेने ग्रामीण रुग्णालयात येत आहेत. अहमदपूर तालुक्यातील जनतेला आरोग्याची सोय उपलब्ध व्हावी, या हेतूने ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आली. मात्र, सदरची रुग्णवाहिकाच आजारी (बिघाड) पडल्याने रुग्णांना वेळेवर जिल्हा रुग्णालय गाठून उपचार मिळविने कठीण झाले आहे. अहमदपूर येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिका खूपच जूनी असून, रुग्णवाहिका खिळखिळी झाली आहे. नेहमीच नादुरुस्त असल्याने रुग्णांच्या गैरसोयीबद्दल आरोग्यासंबधी प्रश्न निर्माण झाला आहे. अहमदपूर तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय असल्याने शहरासह परिसरातील
रुग्णांना वेळेवर उपचार मिळावा, यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध असणे गरजेचे आहे.
अहमदपूर ग्रामीण रुग्णालयाला जूनी रुग्णवाहीका असल्याने त्या रुग्णवाहिकेत वारंवार बिघाड होत आहेत. रुग्णवाहिकेच्या दुरुस्तीसाठी वेळ लागत असल्याने, रुग्ण-नातेवाइकांची हेळसांड हाेत आहे. रुग्णवाहिका दुरुस्तीच्या कालावधीत गंभीर रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यासाठी रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याने रुग्णांना भटकंती करावी लागत आहे. अशावेळी रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्यास एखाद्या रुग्णाचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. रुग्णाला तात्काळ सेवा देण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिका अत्यावश्यक आहे. मात्र अहमदपूर ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिका नेहमीच आजारी असल्याचे निदर्शनास येत आहे. वारंवार आजारी रुग्णवाहिकेवर उपचार (दुरुस्ती) करण्यापेक्षा त्वरीत रुग्णांच्या सेवेस नविन रुग्णवाहिका उपलब्ध करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या अवघडलेल्या परिस्थितीत रुग्ण सेवा देताना रुग्ण, नातेवाईकांच्या रोषाला डॉक्टर, कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे.
नातेवाईकांना शोधावी लागते रुग्णवाहिका...
ग्रामीण रुग्णालयाला
खूप वर्षांपूर्वी रुग्णवाहिका देण्यात आली आहे. सदरची रुग्णवाहिका भंगार झाल्याने त्यामध्ये वारंवार बिघाड होत आहे. नेहमीच रुग्णवाहिका नादुरुस्त असते. प्रकृती चिंताजनक असलेल्या रुग्णांना दुसरीकडे हलविण्यासाठी रुग्णवाहिका शोधताना नातेवाईकांना बरीच कसरत करावी लागते.
अहमदपूरतालुक्यातील रुग्णांसांठी तातडीने नविन रुग्णवाहिका
देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
नवीन रुग्णवाहिका देण्याची मागणी...
अहमदपूर तालुक्यात १२४ गाव, वाडी तांड्यांचा समावेश असून, शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रस्तुती रुग्ण व सर्वसामान्य रुग्णांचे हाल होत आहेत. रुग्णवाहिकेमुळे प्रस्तुती रुग्णांना वेळेवर उपचार न मिळेल्यामुळे दगावल्याच्या घटना घडत आहेत. अहमदपूर ग्रामीण रुग्णालयाची जुनी नादुरुस्त रुग्णवाहिका शोभेची वस्तू बनल्याचे चित्र आहे.
प्रशासनाने व प्रतिनिधी लक्ष घालून ग्रामीण रुग्णालयास नविन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात यावे.
रुग्णवाहिकेत वारंवार हाेताेय बिघाड...
अहमदपूर येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिका जुनी झाल्याने त्यामध्ये वारंवार बिघाड होत आहे. सतत नादुरुस्त असणाऱ्या रुग्णवाहिकेचा रुग्ण आणि नातेवाइकांना फटका बसत आहे. नवीन रुग्णवाहिकेसाठी आरोग्य विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे, असे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक डॉ. दत्तात्रय बिरादार म्हणाले.