निलंग्यात २१५ रूग्णांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:20 IST2021-04-27T04:20:26+5:302021-04-27T04:20:26+5:30
औषधे असतानाही रूग्णांना ठराविक औषधी दुकानामधून औषधे आणण्यासाठी उपजिल्हा रूग्णालयातून चिठ्ठी दिली जाते, अशा तक्रारी तहसीलदारांकडे आल्या होत्या़ ...

निलंग्यात २१५ रूग्णांची लूट
औषधे असतानाही रूग्णांना ठराविक औषधी दुकानामधून औषधे आणण्यासाठी उपजिल्हा रूग्णालयातून चिठ्ठी दिली जाते, अशा तक्रारी तहसीलदारांकडे आल्या होत्या़ त्यावरून तहसीलदार गणेश जाधव यांनी रूग्णालयास भेट देऊन रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी चर्चा केली़ त्यानंतर महाजन मेडिकलची तपासणी केली असता डॉ़ पाटील यांच्या नावाच्या २१५ चिठ्ठ्या आढळून आल्या़ तहसीलदारांनी दोन तास बिलांची चौकशी केली़ रूग्णालयातील औषधांचा साठा तपासला़ तसेच यावेळी एक रूग्ण बरा होऊन सुटी मिळाल्याने महाजन मेडिकलमधून आणलेली शिल्लक औषधे परत करण्यासाठी आला होता़ शासकीय रूग्णायलात औषधे असतानाही ९ हजार ७१३ रूपयांची औषधे संबधित रुग्णाकडून बाहेरून मागविल्याचे समक्ष तपासणीत आढळले़ सदरील तपासणी करताना मुख्याधिकारी मल्लीकार्जुन पाटील, नायब तहसीलदार अरूण महापुरे, मनोज बरमदे उपस्थित होते.
रूग्ण, नातेवाईकांनी तक्रारी कराव्यात...
तहसीलदार गणेश जाधव म्हणाले, मेडिकलशी संगनमत दिसत असून, डॉ़ दिनकर पाटील यांच्या नावाने दिलेल्या अनेक चिठ्ठ्यांमुळे गडबड लक्षात आली आहे़ या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल तयार करून जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी़ पी़ यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे़ जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक, अन्न औषध प्रशासन यांच्या मार्फतही चौकशी होऊन दोषींवर कारवाई होणे अपेक्षित आहे़ रेमडीसीवीर अथवा कोणत्याही औषधांसाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब कोणी करत असेल तर संपर्क साधावा, असे आवाहनही तहसीलदार जाधव यांनी केले आहे़
या संदर्भात, नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे म्हणाले, आजवर मयत झालेल्या रूग्णांना किती रेमडेसिविर देण्यात आले़ त्यात बाहेरून किती मागविले़ त्यात २२ तारखेला १८ रूग्ण कशामुळे दगावले, याचा सूक्ष्म अहवाल जिल्हा रूग्णालयाने द्यावा़