काेपरा प्रकरणातील आरोपींच्या अटकेसाठी अहमदपुरात रास्ता राेकाे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:17 IST2021-03-24T04:17:41+5:302021-03-24T04:17:41+5:30
अहमदपूर तालुक्यातील कोपरा येथे १२ मार्च रोजी अतिक्रमण हटविण्याच्या कारणावरून घटना घडली. या प्रकरणी किनगाव पाेलीस ठाण्यात सरपंच, उपसरपंच, ...

काेपरा प्रकरणातील आरोपींच्या अटकेसाठी अहमदपुरात रास्ता राेकाे
अहमदपूर तालुक्यातील कोपरा येथे १२ मार्च रोजी अतिक्रमण हटविण्याच्या कारणावरून घटना घडली. या प्रकरणी किनगाव पाेलीस ठाण्यात सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्य आणि इतराविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला अद्यापही अटक करण्यात आली नाही. त्यास अटक करण्यात यावी, पीडितेला न्याय देण्यात यावा, या प्रमुख मागण्यांसाठी अहमदपुरात मंगळवारी सकाळी रास्ता राेकाे आंदाेलन करण्यात आले. यावेळी प्रशासनाला आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे, कोपरा प्रकरणातील सर्व आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी, पीडितेवरील खोटा गुन्हा रद्द करण्यात यावा, ग्रामसेवकाचे निलंबन करण्यात यावे, सरपंच आणि उपसरपंचाचे पद रद्द करण्यात यावे. उपसरपंच हा शासकीय सेवेत असून, त्याला निलंबित करण्यात यावे. पीडितेच्या बाजूने खटला लढण्यासाठी विशेष सरकारी वकिलाची नेमणूक करण्यात यावी. दिशा कायद्यांतर्गत याची चौकशी करण्यात यावी. पीडितेचे पुनर्वसन करून दहा लाखांची आर्थिक मदत करण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश आहे. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर रास्ता रोको आंदाेलन करण्यात आले. यावेळी सकल मराठा क्रांती मोर्चा, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.