विद्युत खांब न काढताच रस्ता रुंदीकरण, वाहनधारकांची कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:19 IST2021-02-13T04:19:22+5:302021-02-13T04:19:22+5:30
उदगीर : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून देगलूरकडे जाणाऱ्या मार्गावर दीड ते दोन वर्षांपूर्वी नव्याने रुंदीकरण करण्यात आले. मात्र, ...

विद्युत खांब न काढताच रस्ता रुंदीकरण, वाहनधारकांची कसरत
उदगीर : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून देगलूरकडे जाणाऱ्या मार्गावर दीड ते दोन वर्षांपूर्वी नव्याने रुंदीकरण करण्यात आले. मात्र, सदरील रस्त्यात असलेल्या डीपी व विद्युत खांब न काढल्याने सध्या हे खांब, डीपी रस्त्याच्या मध्यभागी आल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांना कसरत करावी लागत आहे. परिणामी, पादचारी व वाहनधारकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून देगलूरकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण झाले. हे रुंदीकरण करण्याच्यापूर्वी रस्त्याच्या मध्यभागी असलेले विद्युत खांब व डीपी काढणे आवश्यक होते. परंतु, सार्वजनिक बांधकाम खात्याने त्याकडे दुर्लक्ष करीत विद्युत खांब व डीपी न काढता रुंदीकरण केले. दरम्यान, या भागातील नागरिकांनी ही समस्या सार्वजनिक बांधकाम विभाग व महावितरणच्या निदर्शनास आणून दिली. परंतु, संबंधितांनी त्याकडे दुर्लक्ष करीत रस्त्याचे काम पूर्ण केले.
देगलूर रस्ता हा नेहमीसाठी वर्दळीचा आहे. मॉर्निंग वॉकसाठीही नागरिकांची पहाटे मोठी गर्दी होत असते. तसेच या भागात अनेक शाळा, महाविद्यालये व हॉस्पिटल आहेत. त्यामुळे या रस्त्यावर पादचारी व वाहनांची सतत गर्दी असते. सदरील रस्त्याच्या मध्यभागी असलेली डीपी व खांब अडसर ठरत आहेत. यामुळे संबंधित विभागांनी तत्काळ लक्ष देऊन रस्त्यातील अडथळे दूर करावेत, अशी मागणी होत आहे.
निधी उपलब्ध होताच काम सुरू...
देगलूर रोडवर असलेली विद्युत डीपी व खांबांचा धोका लक्षात घेऊन आम्ही नव्याने अंदाजपत्रक तयार करून डीपीडीसीकडे दाखल केले आहे. सदरील कामासाठी आर्थिक तरतूद होताच प्राधान्याने हा प्रश्न सोडवू. तसेच संभाव्य धोका टाळता यावा म्हणून विद्युत डीपी व खांबांना रेडियम लावण्यात आले आहेत. खांबावरील ताराही ओढण्यात आल्या आहेत. हे काम लवकरात लवकर करून घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानेही पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे महावितरणचे सहाय्यक अभियंता राजीव भुजबळे यांनी सांगितले.