३० वर्षांपासून रखडलेला रस्ता होणार पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:26 IST2021-02-26T04:26:39+5:302021-02-26T04:26:39+5:30
शहरातील पांचाळ कॉलनी, ज्ञानेश्वरनगर, बालाजीनगर, शिक्षक कॉलनी, घाडगेनगर, रामकृष्णनगर, एसटी कॉलनी आदी भागांतील नागरिकांसाठी हा रस्ता अतिशय महत्त्वाचा आहे. ...

३० वर्षांपासून रखडलेला रस्ता होणार पूर्ण
शहरातील पांचाळ कॉलनी, ज्ञानेश्वरनगर, बालाजीनगर, शिक्षक कॉलनी, घाडगेनगर, रामकृष्णनगर, एसटी कॉलनी आदी भागांतील नागरिकांसाठी हा रस्ता अतिशय महत्त्वाचा आहे. २०१३ मध्ये यातील अर्धा रस्ता नगरपालिकेने बनविला होता. मात्र, यापुढील रस्ता हा संबंधित शेतमालकांच्या तक्रारीमुळे अडविण्यात आलेला होता. आता त्यावर मार्ग काढून हा रस्ता लातूर- बीदर रोडला जोडला जाणार असल्याचे नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांनी प्रत्यक्ष पाहणीवेळी सांगितले.
यावेळी उपविभागीय अधिकारी विकास माने, नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, नगरपालिका अभियंता कैलास वारद, मंडळ अधिकारी आर. व्ही. देशमुख, भू-लेखा अधिकारी प्रशांत स्वामी, शेतमालक अविनाश देशमुख, सुहास देशमुख आदी उपस्थित होते.
हा रस्ता १९९२ मध्ये मंजूर केला होता. त्यानंतर २०१३ मध्ये प्रत्यक्ष डांबरीकरणास सुरुवात झाली. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे रस्त्याचे काम खोळंबले होते. आता हा रस्ता पूर्ण करून परिसरातील नागरिकांना वहिवाटीसाठी खुला करण्यात येणार असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. या परिसरात भूकंपानंतर मोठी वस्ती झाली. हा रस्ता व्हावा, यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्नशील होते. त्यासाठी परिसरातील नागरिकांनी अनेकदा प्रशासनदरबारी निवेदनेही दिली होती.