अहमदपूर : तालुक्यात मान्सूनपूर्व व मृगाचा पाऊस झाल्याने आतापर्यंत ९७.३२ टक्के खरिपाच्या पेरण्या झाल्या. दरम्यान, पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. गेल्या दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस हाेत असल्याने कोमेजून जाणाऱ्या कोवळ्या पिकांना आधार मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
मृगाच्या प्रारंभीच्या पावसावर तालुक्यातील शेतकऱ्यांनी ४१ हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा केला. तसेच ४ हजार ६२१ हेक्टरवर कापसाची लागवड केली. पिकेही चांगली उगवली. मात्र, १५ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. वाढत्या उन्हामुळे कोवळी पिके करपण्याच्या मार्गावर होती. महागामोलाचे बी-बियाणे, खताचा खर्च निष्फळ ठरून दुबार पेरणी करावी लागणार की काय, अशी भीती व्यक्त होत होती. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागून होती. दोन दिवसांपासून तालुक्यात रिमझिम व मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. त्यामुळे पिकांना आधार मिळाला असून, समाधान व्यक्त होत आहे.
११ हजार ७६८ हेक्टरवर तूर...
तालुक्यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा होतो. त्यापाठोपाठ तुरीचा होतो. यंदा तुरीचा ११ हजार ७६८ हेक्टरवर पेरा झाला असून, मूग ७७४ हेक्टर, उडीद ४५४ हेक्टरवर पेरा झाला आहे. तालुक्यात एकूण ६९ हजार ७३७ हेक्टरवर पिकांची लागवड झाली आहे. मध्यंतरीच्या काळात पावसाने उघडीप दिल्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे, ते तुषार सिंचनाद्वारे पीक वाचविण्याचा प्रयत्न करीत होते.
पिकांना तात्पुरता आधार मिळाला...
यंदा चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र, मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. सध्या रिमझिम पाऊस होत असल्याने पिकांना तात्पुरता आधार मिळाला आहे.
- पिंटु मुंढे, शेतकरी.
शेतीमालास योग्य भाव हवा...
दिवसेंदिवस शेती परवडत नाही. त्यात निसर्गही साथ देत नाही. एखाद्या वर्षी निसर्गाने साथ दिली तर शेतीमालाला भाव मिळत नाही. सरकारने शेतपिकांना योग्य भाव द्यावा. तसेच सिंचनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी.
- प्रवीण लांजे, शेतकरी.
गेल्या वर्षीही फटका...
मागील वर्षी काढणीच्या वेळी पाऊस झाल्याने पिकांना फटका बसला. त्यामुळे हातची पिके गेली. यंदा महागामोलाची बी-बियाणे, खते खरेदी करून पेरणी केली आहे.
- कालिदास कदम, शेतकरी.
चिंता कमी झाली...
जूनच्या पहिल्या आठवड्यात खरिपाची पेरणी केली. मध्यंतरी पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र, रिमझिम पावसामुळे सध्या चिंता कमी झाली आहे.
- वसंत पवार, शेतकरी.