मालवाहतुकीतून अहमदपूर आगारास ३२ लाखांचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:19 IST2021-04-22T04:19:22+5:302021-04-22T04:19:22+5:30
गत वर्षी कोरोनाचा संसर्ग सुरु झाला. त्यामुळे लॉकडाऊन करण्यात आले. त्याचा परिणाम सर्व क्षेत्रांस झाला. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे ...

मालवाहतुकीतून अहमदपूर आगारास ३२ लाखांचे उत्पन्न
गत वर्षी कोरोनाचा संसर्ग सुरु झाला. त्यामुळे लॉकडाऊन करण्यात आले. त्याचा परिणाम सर्व क्षेत्रांस झाला. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे उत्पन्नही घटले. त्यामुळे एसटीने नवीन धोरण अवलंबित प्रवासी वाहतुकीबरोबर मालवाहतुकीस सुरुवात केली. १५ ऑगस्ट रोजी आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते मालवाहतुकीस प्रारंभ झाला. मागील सहा महिन्यांत तब्बल ५८ हजार ७०७ किलोमीटरची वाहतूक करून व प्रति किमी ४५ रुपये ६४ पैसे असे उत्पन्न अहमदपूर आगाराने मिळविले आहे.
अहमदपूर आगाराच्या दोन मालवाहतूक गाड्या तसेच उदगीर, औरंगाबाद, सोलापूर, नांदेड, लातूर या आगाराच्या काही गाड्या मिळून ३२ लाख ५३ हजार ७९९ रुपयांचे उत्पन्न झाले आहे. याच कालावधीमध्ये प्रवासी वाहतूक अत्यंत कमी झाली. प्रवासी वाहतुकीतून सरासरी उत्पन्न १ किमीस २६ रुपये ४८ पैसे झाले आहे. त्यामुळे प्रवासी वाहतुकीपेक्षा मालवाहतुकीच्या उत्पन्नात २० रुपये प्रति किमी अधिक उत्पन्न असल्याने मालवाहतूक तारणहार करणारी ठरली आहे. अहमदपूर आगाराने सोयाबीन, गूळ, पाणी बाटली, किराणा साहित्य, कांदा, तूरडाळ अशा कृषी उत्पादनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक केली. तसेच यापुढेही सदर वाहतूक सुरू राहणार असल्याचे आगारप्रमुख शंकर सोनवणे यांनी सांगितले.
कर्मचाऱ्यांचे प्रयत्न...
मालवाहतूक सुरू झाल्यापासून वाहतूक पर्यवेक्षक बाळू गुंडरे, वाहन वाहतूक नियंत्रक भागवत यांनी परिश्रम घेतले. त्यांच्या प्रयत्नांमुळे अहमदपूर आगारास एवढे उत्पन्न मिळाले आहे. सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. अहमदपूर आगाराने माल वाहतुकीतून ३२ लाख रुपये कमविले असले तरी प्रवासी वाहतुकीतून १० कोटी ८२ लाख रुपये मिळविले आहे. प्रवासी वाहतुकीपेक्षा मालवाहतुकीचे भारमान व किमी उत्पन्न अधिक आहे, असे आगार प्रमुख शंकर सोनवणे यांनी सांगितले.