उदगीरात जनता कर्फ्यूला पहिल्या दिवशी प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:37 IST2021-02-28T04:37:36+5:302021-02-28T04:37:36+5:30
जिल्हा प्रशासनाच्यावतीने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शनिवार व रविवार असे दाेन दिवस जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले आहे; मात्र याबाबत ...

उदगीरात जनता कर्फ्यूला पहिल्या दिवशी प्रतिसाद
जिल्हा प्रशासनाच्यावतीने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शनिवार व रविवार असे दाेन दिवस जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले आहे; मात्र याबाबत सक्ती करण्यात आली नव्हती. आठवड्याचा चौथा शनिवार असल्याने बँका, उपजिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय न्यायालय, पंचायत समिती,नगरपालिका आदी शासकीय कार्यालय बंद असल्याने ग्रामीण भागातून नागरिक दाखल झाले नाहीत. लांब पल्याच्या तसेच लातूर, अहमदपूर मार्गावर एसटी बसेस सुरू असल्या तरी प्रवाशांची संख्या मात्र अल्प हाेती. ग्रामीण भागात प्रवासी नसल्याने बसफेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती उदगीर येथील स्थानक प्रमुख यशवंतराव कानतोडे यांनी दिली. नेहमी वर्दळीचा भाग असणारा छत्रपती शिवाजी महाराज चौक शनिवारी मात्र मोकळा होता. बसस्थानक परिसरात अल्प प्रवासी दिसून येत हाेते.
उदगीर शहरातील परिस्थितीवर उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन, उदगीर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोरख दिवे, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे हे लक्ष ठेवून होते.
आडत बाजार बंद...
उदगीर शहरातील आर्थिक उलाढालीचे केंद्र असलेले मार्केट यार्ड जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील प्रशासन, व्यापाऱ्यांनी आडत बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. उदगीर येथील मोंढ्यात ग्रामीण भागातून एकही वाहन शनिवारी आले नाही. त्याचबराेबर मार्केट यार्डातील कुठलेही दुकान दिवसभर उघडे नव्हते. यातून जनता कर्फ्यूला आडत बाजारात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.