कृषी पंपधारकांचा प्रतिसाद; पावणे नऊ कोटींचे भरले वीजबिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:34 IST2021-02-18T04:34:23+5:302021-02-18T04:34:23+5:30
परिमंडळातून गत २५ दिवसांत कृषी धोरणाची अंमलबजावणी होत असून, ३१ हजार ६०० शेतकऱ्यांनी ८ कोटी ४८ लाख रुपयांचा भरणा ...

कृषी पंपधारकांचा प्रतिसाद; पावणे नऊ कोटींचे भरले वीजबिल
परिमंडळातून गत २५ दिवसांत कृषी धोरणाची अंमलबजावणी होत असून, ३१ हजार ६०० शेतकऱ्यांनी ८ कोटी ४८ लाख रुपयांचा भरणा केला आहे. यामध्ये लातूर जिल्ह्यातील ४ हजार ७८१ शेतकऱ्यांनी १ कोटी ३६ लाख, बीड जिल्ह्यातील २३ हजार ५८८ शेतकऱ्यांनी ६ कोटी २४ लाख, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ३ हजार २४४ शेतकऱ्यांनी ८६ लाख ८१ हजार रुपयांचा भरणा केला आहे. महावितरणच्या वतीनेही वीज ग्राहकांना प्रोत्साहन देण्यासाठी बिल भरणाऱ्यांचा सत्कार केला जात आहे. कृषी धोरण २०२० अंतर्गत शेतकऱ्यांना महावितरणच्या वतीने सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे वीज बिल भरणा करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. लातूर परिमंडळातील बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात कृषी पंपधारकांकडे सर्वाधिक थकबाकी आहे. दरम्यान, वीजबिल भरणा करण्यासाठी कृषी पंपधारकांचा प्रतिसाद मिळत असून, ज्यांच्याकडे वीजबिल थकीत आहे, त्यांनी तात्काळ भरणा करावा, असे आवाहन लातूर परिमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
भरणा करणाऱ्यांचा सत्कार
लातूर परिमंडळातील थकित वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचा महावितरणच्या वतीने सत्कार करण्यात येत आहे. यामध्ये औसा तालुक्यातील खुंटेगाव, सेलू, आलमला, लातूर तालुक्यातील हरंगुळ, हणमंतवाडी, बोरी, काटगाव, उदगीर तालुक्यातील थोडगावाडी आदी गावांतील वीज ग्राहकांचा महावितरणचे कार्यकारी अभियंता गणेश सामसे, उपकार्यकारी अभियंता शिवाजी रेड्डी आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता.