शिरूर अनंतपाळ तालुक्यातील दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:20 IST2020-12-31T04:20:29+5:302020-12-31T04:20:29+5:30
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ, येरोळ, हिप्पळगाव, डिगोळ, तळेगाव (दे) ,धामणगाव, हालकी, लक्कडजवळगा, अंकुलगा (स), कळमगाव, शिवपूर, बोळेगाव (बु.), ...

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ, येरोळ, हिप्पळगाव, डिगोळ, तळेगाव (दे) ,धामणगाव, हालकी, लक्कडजवळगा, अंकुलगा (स), कळमगाव, शिवपूर, बोळेगाव (बु.), कानेगाव, कांबळगा, सुमठाणा, चामरगा, शेंद (उत्तर), डोंगरगाव (बो), जोगाळा, होनमाळ, बिबराळ, कारेवाडी, सांगवीघुग्गी, थेरगाव, तिपराळ, उमरदरा, भिंगोली आदी २७ गावांतील ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या आहेत. यामध्ये साकोळ, येरोळ, डिगोळ, सुमठाणा, बोळेगाव (बु.), कानेगाव, तळेगाव (दे), चामरगा आदी ग्रामपंचायती मोठ्या आहेत. याशिवाय कारेवाडी ग्रामपंचायत राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, कानेगाव ग्रामपंचायत जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती गोविंदराव चिलकुरे, लक्कडजवळगा ग्रामपंचायत जिल्हा परिषद सदस्य राजीव कांबळे, बोळेगाव (बु.) ग्रामपंचायत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रभाकर बंडगर, साकोळ ग्रामपंचायत राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष कल्याणराव बरगे, येरोळ ग्रामपंचायत पंचायत समिती सदस्या सुमनताई गंभिरे यांच्या गावातील आहेत. त्यामुळे विविध राजकीय पदांवर कार्य करणाऱ्या दिग्गजांना आपल्या गावातील ग्रामपंचायतींचा गड राखण्यात यश मिळते का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
याशिवाय हिप्पळगाव ग्रामपंचायत राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष डी.एन. शेळके यांच्या गावातील आहे. त्यामुळे थेरगाव, शिवपूर या ग्रामपंचायती कोणाच्या ताब्यात जाणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
प्रत्येक गावांतील तरुण उत्साही...
ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे मिनी मंत्रालय समजले जाते. गावाचे नेतृत्व केले तर तालुक्याला आणि जिल्ह्याला संधी मिळू शकते. म्हणून प्रत्येक गावातील तरुणाई निवडणूक जिंकण्यासाठी उत्साही असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
हलगीच्या तालावर नामांकन दाखल...
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याची बुधवारी शेवटची तारीख होती. त्यामुळे तहसील कार्यालयाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते, तर बोळेगाव, तळेगाव, चामरगा आदी गावांतील उमेदवारांनी हलगीच्या तालावर नामांकनपत्र दाखल केले.