लातूर : केंद्र सरकारने पारित केलेले तीन शेतकरीविरोधी कायदे रद्द करावे, या मागणीसाठी ‘शेती वाचवा, लोकशाही वाचवा’ या आंदोलनाचा भाग म्हणून किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना शनिवारी निवेदन देण्यात आले. कोणत्याही राज्याला विचारात न घेता केंद्र सरकारने कृषी कायदे मंजूर केले आहेत. हे कायदे रद्द करण्यासाठी दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच आहे. मात्र, केंद्र सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. या तीन शेतकरीविरोधी कायद्यांमुळे शेतीव्यवसाय धोक्यात येणार आहे. हे कायदे रद्द करण्यासाठी किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने वेळोवळी निवेदने, आंदोलने करण्यात आली आहेत. त्यामुळे ‘शेती वाचवा, लोकशाही वाचवा’ या आंदोलनांतर्गत किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर ॲड. उदय गवारे, सुधाकर शिंदे, ॲड. सुशील सोमवंशी, ॲड. विजय जाधव, एकनाथराव कवठेकर, ॲड. डी. जी. बनसोडे, सतीश देशमुख, प्रताप भोसले, शैलेश सरवदे आदींसह किसान संघर्ष समन्वय समितीचे पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
शेतकरीविरोधी कायदे रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:14 IST