तीन हंगामी पिके घेत विक्रमी उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:19 IST2021-04-18T04:19:14+5:302021-04-18T04:19:14+5:30
चाकूर : तालुक्यातील मांडुरकी येथील एका शेतक-याने खरीप, रबी हंगामातील पिकांतून विक्री उत्पादन घेत आहे. याशिवाय, उन्हाळ्यात मुगाची लागवड ...

तीन हंगामी पिके घेत विक्रमी उत्पादन
चाकूर : तालुक्यातील मांडुरकी येथील एका शेतक-याने खरीप, रबी हंगामातील पिकांतून विक्री उत्पादन घेत आहे. याशिवाय, उन्हाळ्यात मुगाची लागवड केली आहे. सध्या हे पीक बहरले आहे. त्यामुळे त्यांच्या शेतीची तालुकाभर चर्चा होत आहे.
तालुक्यातील मांडुरकी येथील शेतकरी गुरुनाथ मोरगे व त्यांची पत्नी भागीरथीबाई हे गावात मोलमजुरी करुन जीवन जगत असत. गावापासून ७- ८ किमी अंतरावर तळ्याच्या कामावर ते जात असत. त्यातून संसाराचा गाडा चालवित. त्यांना दोन मुले, एक मुलगी आहे. मजूरी करीत त्यांनी मुलगी त्रिगुना हिला शिक्षण देऊन शिक्षिका बनविले. त्या अहमदपूर येथील ज्ञानेश्वर विद्यालयात सहशिक्षिका आहेत. मोठा मुलगा मल्लिकार्जून यांचे चाकुरात किराणा दुकान आहे तर लहान मुलगा बस्वराज हा मालवाहू टेम्पो घेऊन व्यवसाय करतो.
दररोजच्या उदरनिर्वाहातून मोरगे यांनी काही रक्कम जमा करुन ठेवत असत. त्यातून त्यांनी १९९० मध्ये दोन हेक्टर जमीन खरेदी केली. त्यानंतर अत्याधुनिक पद्धतीने शेतीची कास धरली. मित्र चंद्रशेखर मुळे यांच्या सल्ल्याने त्यांनी यंदा कोरोनाच्या संकटाच्या काळात दोन हेक्टर जमिनीवर खरिपातील सोयाबीनचे ४८ क्विंटल विक्रमी उत्पन्न घेतले. त्यानंतर रब्बी हंगामात हरभ-याची पेरणी केली. त्यातून ३४ क्विंटलचे उत्पन्न घेतले. तसेच धन्याची पेरणी केली होती. बाजारात भाव कमी असताना धना विक्रीतून त्यांना ३८ हजार रुपये मिळाले.
सध्या त्यांनी उन्हाळ्यात मुग घेतले आहे. खरिपाप्रमाणे मुग बहरले आहे. ५ ते ७ क्विंटल मुगाचे उत्पन्न होईल, असे मोरगे यांनी सांगितले. मोलमजुरीपासून सुरु केलेला असा त्यांचा खडतर प्रवास आहे. एकत्र कुटुंब पद्धतीत असलेल्या मोरगे यांनी कुटुंबियांच्या मदतीने शेती कसतात.