जिल्ह्यातील रेशन कार्डधारकांना मिळणार मका अन् बाजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:20 IST2021-02-16T04:20:33+5:302021-02-16T04:20:33+5:30
लातूर : रेशन दुकानातून गहू, तांदूळ व धान्य दिले जाते. मार्चमध्ये बाजरी आणि मकादेखील दिला जाणार आहे. त्याअनुषंगाने जिल्हा ...

जिल्ह्यातील रेशन कार्डधारकांना मिळणार मका अन् बाजरी
लातूर : रेशन दुकानातून गहू, तांदूळ व धान्य दिले जाते. मार्चमध्ये बाजरी आणि मकादेखील दिला जाणार आहे. त्याअनुषंगाने जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने तयारी करण्यात आली आहे. मका आणि बाजरी मिळणार असल्याने गहू कमी प्रमाणात वाटप केला जाणार आहे.
जिल्ह्यात एकूण पाच लाख नऊ हजार २७० शिधापत्रिकाधारक आहेत. यामध्ये एपीएल ६६ हजार ३००, अंत्योदय ४२ हजार, तर केशरी तीन लाख ३० हजार ६९ कार्डधारक आहेत. भरडधान्य योजनेअंतर्गत स्वस्त धान्य दुकानावर मार्च महिन्यात बाजरी व मका दिला जाणार आहे. प्राधान्याने कुटुंब व एपीएल कार्डधारकांना दोन किलो गहू व तीन किलो तांदूळ दिले जात होते. अनेकांच्या शेतात गहू पिकविला जात नसल्यामुळे त्यांना गव्हाची जास्त आवश्यकता असते. मात्र, भरडधान्य योजनेचा लाभ रेशनवर मिळणार असल्यामुळे मार्च महिन्यात चपातीऐवजी बाजरीची भाकरी खावी लागणार आहे, तर मक्याचा जास्त वापर केला जात नाही. त्यामुळे मका का दिला जात आहे, असा प्रश्न लाभार्थ्यांना पडत आहे. शासनाने गहू व मका द्यावाच. सोबतच दर महिन्याप्रमाणे गहू व तांदूळही द्यावा, अशी मागणी रेशन कार्डधारकांमधून होत आहे.
किलोचे दर दोन व तीन रुपये
रेशनच्या लाभार्थ्यांसाठी दोन रुपये किलो गहू व तीन रुपये किलो तांदूळ दिला जातो. मका आणि बाजरीदेखील याच किमतीत दिले जाणार आहे. मार्च महिन्यापासून लातूर जिल्ह्यात मका आणि बाजरीचे वितरण करण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.
मार्चपासून होणार वाटप
पुरवठा विभागाकडून मार्चमध्ये वाटप करण्यात येणाऱ्या बाजरी व मक्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. कोणत्या ठिकाणी किती धान्य पाठवायचे, याचे नियोजन सुरू असून, नियतनानुसार पुरवठा केला जाणार आहे. रेशन दुकानदार व तालुकास्तरावर याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.
- जिल्हा पुरवठा अधिकारी सदाशिव पडदुणे.
रोजच्या जेवणात भाकरीपेक्षा चपातीचा वापर जास्त केला जातो. शेतातील गहू बाजारात दाखल झालेला नाही. रेशनच्या दुकानात गहू मिळतो, तोच मार्च महिन्यात मिळाला पाहिजे.
- लाभार्थी
बाजरी मिळाली तर भाकरी करता येईल. मात्र मक्याचा कशासाठी वापर करावा, हा प्रश्न आहे. शासनाने गहू, तांदूळ पूर्वीप्रमाणेच द्यावा व बाजरीही मक्याऐवजी अधिक द्यावी. -लाभार्थी
जिल्ह्यातील एकूण लाभार्थी
एपीएल ६६३००
अन्त्योदय ४२०००
केशरी ३,३०,०६९