पावसामुळे सोयाबीन तरारले, खोडअळीचा धोका वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:16 IST2021-07-17T04:16:50+5:302021-07-17T04:16:50+5:30
अहमदपूर : आर्थिक अडचणींवर मात करीत शेतकऱ्यांनी महागामोलाची बी- बियाणे, खते खरेदी करून खरिपाची पेरणी केली. मध्यंतरी पावसाने उघडीप ...

पावसामुळे सोयाबीन तरारले, खोडअळीचा धोका वाढला
अहमदपूर : आर्थिक अडचणींवर मात करीत शेतकऱ्यांनी महागामोलाची बी- बियाणे, खते खरेदी करून खरिपाची पेरणी केली. मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. दरम्यान, सतत पाऊस सुरू झाल्याने सोयाबीनसह अन्य पिके तरारली आहे. मात्र, आता सोयाबीनवर खोडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे नवे संकट निर्माण झाले आहे.
यंदा मृगाच्या प्रारंभी पाऊस झाल्याने काही शेतकऱ्यांनी उसनवारी, कर्ज काढून खरिपाची पेरणी केली. तालुक्यात आतापर्यंत एकूण ६९ हजार हेक्टरवर पेरा झाला असून त्यात सोयाबीन ४१ हजार हेक्टरवर आहे. पावसामुळे पिकेही चांगली उगवली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या. दरम्यान, पावसाने उघडीप दिल्याने कोवळी पिके कोमेजू लागली. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे, त्यांनी तुषारद्वारे पाणी दिले.
दरम्यान, गत आठवड्यापासून तालुक्यात सतत पाऊस होत आहे. त्यामुळे पिकांना जीवदान मिळाले. शेतकरी आनंदित झाले. परंतु, आता सोयाबीनवर खोडअळीचा प्रादुर्भाव दिसून येऊ लागला आहे. ही खोडअळी सोयाबीन पिकांवर हल्ला करीत असल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. नव्या संकटामुळे चिंता व्यक्त हाेत आहे. परिणामी, उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
तालुक्यात खरिपाचा ६९ हजार ७३७ हेक्टर पेरा झाला असून ४१ हजार हेक्टरवर सोयाबीन आहे.
४ हजार ६२१ हेक्टरवर कापूस लागवड आहे. ज्वारी- १ हजार ७९१, तूर ११ हजार ७६८ हेक्टरवर आहे. मूग ७७४ हेक्टर, उडदाचा ४५४ हेक्टरवर पेरा झाला आहे. दमदार पावसामुळे सोयाबीन पीक बहरले. मात्र, आता बदलत्या वातावरणाचा परिणाम दिसून येत आहे.
शेतकऱ्यांपुढे नवनवीन संकट...
यंदा मृगाच्या सुरुवातीला पाऊस
झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. पिकांची उगवण चांगली झाली. मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्याने चिंता वाढली होती. परंतु, पाऊस झाला. त्यामुळे पिके जोमात आहेत. सध्या सोयाबीनवर खोडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे फवारणी करणे गरजेचे ठरत आहे. त्यासाठी पावसाची उघडीप महत्त्वाची आहे. कृषी विभागाने मार्गदर्शन करावे.
- बलभीम पवार, प्रगतशील शेतकरी.
पिकांची काळजी घ्यावी...
तालुक्यातील काही ठिकाणी खोडमाशी व उंट अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. चक्रीभुंगा, खोडअळी आणि उंटअळीच्या नियंत्रणासाठी थायोमिथोक्झाम लॅम्बडा साहलोथ्रीन (अलिका) ३ मिली अथवा प्रोफेनोफॉस सायप स्मेथ्रीन (प्रोफेस सुपर/ पालिट्रीन सी) २० मिली प्रती १० लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी.
सोयाबीन पिकाच्या शेंड्याकडील भागातील पाने पिवळी पडत असल्यास सूक्ष्म मूलद्रव्ये ग्रेड-२.५० मिली, १९: १९: १९ ५० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यातून फवारणी घ्यावी. तसेच सूक्ष्म मूलद्रव्ये ग्रेड-१, १० किलो प्रती एकरी याप्रमाणे कोळप्याच्या पाठीमागे सरते लावून पेरून द्यावे.
- भुजंग पवार, तालुका कृषी अधिकारी