चापोली : जूनच्या प्रारंभी पाऊस झाल्याने चापोली परिसरात ९५ टक्के पेरण्या झाल्या. त्यानंतर मात्र आठवडाभरापासून पावसाने दडी मारल्याने उगवलेली पिके करपू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी पिके वाचविण्यासाठी धडपड करीत असून तुषार सिंचनाद्वारे पाणी देत असल्याचे पहावयास मिळत आहे.
मृगात पेरणी झाल्यास पिके चांगली येतात, अशी शेतकऱ्यांची धारणा आहे. त्यामुळे यंदा मान्सूनपूर्व पाऊस होताच शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीसाठी लगबग सुरू केली. जूनमध्ये झालेल्या पावसावर ९५ टक्के शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या; मात्र, आता पावसाने डोळे वटारल्याने दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. ज्या भागात पुरेसा पाऊस झाला तेथील शेतकऱ्यांनी सोयाबीन, उडीद, मूग, तुरीची पेरणी केली. आता पावसाची नितांत गरज आहे.
पावसाअभावी अंकुरलेली पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. पेरणीनंतर पाऊस गायब झाल्याने पेरणी केलेली बियाणे वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाच्या सुविधा उपलब्ध आहेत त्यांनी तुषार संचाद्वारे सिंचन करण्यास सुरुवात केली आहे. मात्र कोरडवाहू क्षेत्रावरील शेतकरी संकटात सापडले आहेत.
२ हजार ३५८ हेक्टरवर पेरा...
चापोली परिसरात एकूण लागवडीचे क्षेत्र २ हजार ८४५ हेक्टर आहे. त्यापैकी २ हजार ३५८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यात सोयाबीन १ हजार ३९७ हेक्टर, तूर ६९८, मूग- ११२, उडीद- ९४, ज्वारी- १५, बाजरी- ६, मका- ८, भुईमूग- ७, तीळ ४ हेक्टरवर पेरणी झाली आहे.