चाकूर ते उजळंब हा शहरातून सिमेंट रस्ता करण्यात आला. मस्जीद चौक ते लक्ष्मीनगर या भागात रस्त्यावर पडणारे पाणी नालीतून वाहत नाही. शुक्रवारी सायंकाळी पाऊस झाला. या पावसाचे पाणी या भागातील घरात घुसले.
वाॅर्ड क्र. १७ मधील नाल्याची सफाई झाली नाही. सिमेंट रस्ता करताना नालीवर कॉसिंग टाकण्यात आली नाही. घनकचरा व्यवस्थापनावर वर्षाला एक कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च नगरपंचायतीकडून केला जातो. तरी या भागातील नाल्यांची साफसफाई केली जात नाही. परिणामी नाल्यात कचरा साठून त्या तुंबल्या आहेत. डासांचा प्रभाव वाढत आहे. दुर्गंधी सुटून या भागातील जनतेला नरक यातना भोगाव्या लागत आहेत. शुक्रवारी सायंकाळी अवकाळी पावसामुळे या भागात पाणी साठले. नाल्या तुंबल्याने पाण्याला रस्ता मिळत नव्हता. पावसाचे व नालीतील घाण पाणी लोकांच्या घरात घुसले आहे. पावसाळा तोंडावर आला असताना सुद्धा नगरपंचायतीची स्वच्छता मोहीम नाही. शुक्रवारी झालेल्या पावसाचे पाणी पाच ते सहा जणांच्या घरात शिरले. आजच्यापेक्षा मोठे पाऊस पडल्यास या भागातील लोकांना अनेक समस्यांशी सामना करावा लागणार आहे.