नवीन धोरणामुळे शैक्षणिक क्षेत्रात आमुलाग्र बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:19 IST2021-03-08T04:19:58+5:302021-03-08T04:19:58+5:30
लातूर : केंद्र सरकारने जाहीर केलेले नवीन शैक्षणिक धोरण शैक्षणिक क्षेत्रात आमुलाग्र बदल करणारे असून, हे धोरण विकसित ...

नवीन धोरणामुळे शैक्षणिक क्षेत्रात आमुलाग्र बदल
लातूर : केंद्र सरकारने जाहीर केलेले नवीन शैक्षणिक धोरण शैक्षणिक क्षेत्रात आमुलाग्र बदल करणारे असून, हे धोरण विकसित करणे गरजेचे आहे. संपूर्ण राज्यातील सर्व शाळांना प्रशिक्षण देणारी संस्था म्हणून भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेने पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन विद्याभारती या संस्थेचे पश्चिम क्षेत्र मंत्री शेषाद्री डांगे यांनी येथे व्यक्त केले.
राष्ट्रीय स्तरावर देण्यात येणारा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार’ भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह नितीन शेटे यांना नुकताच राजभवनात झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या हस्ते देण्यात आला. यानिमित्त केशवराज संकुलात तपस्वी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव तथा भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते ॲड. मिलिंद पाटील यांच्या हस्ते नितीन शेटे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला, यावेळी डांगे बोलत होते. यावेळी स्थानिक समन्वय समितीचे कार्यवाह जितेश चापसी, समितीचे अध्यक्ष यशवंतराव देशपांडे तावशीकर, वर्षा नितीन शेटे यांच्यासह केंद्रीय कार्यकारिणी सदस्य शंकरराव लासुणे, केंद्रीय विद्यासभेचे अध्यक्ष किरण भावठाणकर, केशवराज शैक्षणिक संकुलाचे पालक विवेक अयाचित, मुख्याध्यापक संजय विभुते, कमलाकर पाटील, ॲड. विश्वनाथराव जाधव, डॉ. मनोज शिरुरे यांची उपस्थिती होती.
शेषाद्री डांगे म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणावर प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेने एक प्रशिक्षण केंद्र चालू करावे, त्यातून राज्यातील सर्व शाळांना प्रशिक्षण देण्याची सर्व व्यवस्था संस्थेने उभी करावी.
नितीन शेटे म्हणाले, वंचित समाजातील छोट्या-छोट्या कामासाठी मदतीचे हात पुढे येण्याची गरज आहे. गत दहा वर्षांपासून आपण समाजातील वंचित व उपेक्षितांसाठी काम निष्ठेने केले व यापुढेही करत राहू. प्रास्ताविक धनंजय कुलकर्णी तुंगीकर यांनी केले. पर्यवेक्षक संजय कुलकर्णी यांनी मानपत्राचे वाचन केले. सूत्रसंचालन राजश्री कुलकर्णी यांनी केले.