देवणी तालुक्यात यंदा मृगाचा पाऊस झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी आनंदित होऊन खरिपाच्या पेरण्या केल्या. दरम्यान, कमी- जास्त प्रमाणात पाऊस होत राहिला. त्यामुळे पिकेही बहरली होती. मात्र, गेल्या महिनाभरापासून पावसाने उघडीप दिली. त्यामुळे नगदी पीक असलेले सोयाबीन पाण्याअभावी वाळत आहे. सध्या शेतकरी चिंतित आहे. खरीप हंगाम हातचा जाणार की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.
दरम्यान, वरुणराजा प्रसन्न व्हावा आणि पाऊस पडावा म्हणून तालुक्यातील विविध गावांत भजन, कीर्तन, अन्नदान, परूचा कार्यक्रम, भंडारा आदी कार्यक्रम होत आहेत. शनिवारी देवणीतील भाविकांनीही पाऊस पडावा म्हणून शहरातील सर्व देवदेवतांना जलाभिषेक केला. त्यानंतर ग्रामदैवत महादेव मंदिरातील मूर्ती पाण्यात ठेवण्यात आली. तसेच जुन्या बाजारातील जाज्वल्य हनुमान मंदिरात व्यापाऱ्यांच्या वतीने परूचा कार्यक्रम घेण्यात येऊन अन्नदान करण्यात आले.