चाकूर तालुक्यात प्रस्थापितांना धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:22 IST2021-01-19T04:22:20+5:302021-01-19T04:22:20+5:30
चाकूर : तालुक्यातील २४ पैकी दोन ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या होत्या. उर्वरित २२ ग्रामपंचायतीचा सोमवारी निकाल लागला. त्यात अनेक ...

चाकूर तालुक्यात प्रस्थापितांना धक्का
चाकूर : तालुक्यातील २४ पैकी दोन ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या होत्या. उर्वरित २२ ग्रामपंचायतीचा सोमवारी निकाल लागला. त्यात अनेक ठिकाणी प्रस्थापितांना पायउतार व्हावे लागले आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या तीन माजी सदस्यांच्या पॅनलचा पराभव झाला आहे. जि.प. सदस्य विमल पाटील व त्यांचे पती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रशांत पाटील यांच्या पॅनलचा पराभव धक्कादायक पराभव झाला.
तालुक्यात नळेगाव ग्रामपंचायत सर्वात मोठी असून, १७ पैकी ९ जागांवर माजी जि. प. सदस्य रामराव बुदरे यांच्या पॅनलला ९ जागा मिळाल्या असून, सूर्यकांत चव्हाण यांच्या पॅनलला ८ जागा मिळाल्या आहेत; मात्र राम बुदरे यांना पराभव पत्कारावा लागला आहे, तर माजी जिल्हा परिषद सदस्य निर्मला भालेकर यांनाही पराभव पत्कारावा लागला आहे. पंचायत समितीच्या सदस्य राजमाने यांचे पती दत्तात्रय राजमाने यांना मतदारांनी नाकारले आहे. विद्यमान सदस्य गौतम दांडे यांचा पराभव शेषेराव जोगदंड यांनी तर मोहन पाटील, नागनाथ दविले यांचा पराभव श्याम मुंजाने यांनी केला. तीन विद्यमान सदस्यांना मतदारांनी घरी बसविले आहे. ग्रामपंचायतीवर सत्ता बुदरे यांची आली आहे; पण पॅनल प्रमुख बुदरे यांचा पराभव झाला. गड आला, पण सिंह गेला, अशी स्थिती निर्माण झाली आहे. मागील निवडणुकीतही पॅनलप्रमुख अमर पाटील यांची सत्ता आली, पण त्यांचाच पराभव झाला होता. त्याचीच पुनरावृत्ती यंदाही झाली आहे.
वडवळ(नागनाथ)ग्रामपंचायतीवर तब्बल पंचेचाळीस वर्ष जिल्हा परिषदेचे माजी सभापती अण्णासाहेब पाटील यांची एकहाती सत्ता होती. कधी सरपंच तर कधी उपसरपंचपद त्यांच्या कुटुंबीयांकडे होते. विद्यमान उपसरपंच वैभव पाटील यांना केवळ तीन मताने पराभवास सामोरे जावे लागले. यावेळी पाटील यांच्या पॅनलला आठ जागा मिळाल्या. नागनाथ बेडके व विवेकानंद लवटे पाटील यांच्या पॅनलला ९ जागा मिळवून सत्तेचे दावेदार झाले आहेत. जिल्हा परिषदेचे सदस्य हर्षवर्धन कसबे विजयी झाले आहेत. विद्यमान सरपंच शिल्पा बेडके यांचे पती राजू बेंडके यांचाही पराभव झाला आहे.
शेळगाव ग्रामपंचायतीत भाजपाच्या विद्यमान जिल्हा परिषद सदस्य विमल पाटील यांचे पती माजी सभापती प्रशांत पाटील यांना केवळ दोन जागावर समाधान मानावे लागले आहे. काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संतोष पाटील यांच्या पॅनलला सात जागा मिळाल्या. अजनसोंडा (बु.) येथे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य हणमंतराव पाटील आणि देवीदास माने व आबासाहेब माने यांच्या पॅनलमध्ये चुरशीची निवडणूक झाली. त्यात हणमंतराव पाटील यांचा पराभव झाला आहे. त्यांचा केवळ एक सदस्य विजयी झाला आहे. तर माने पॅनलवर मतदारांनी भरभरून प्रेम करत त्यांच्या पारड्यात नऊ जागा दिल्या आहेत. रोहिणा ग्रामपंचायतीवर वर्चस्व ठेवण्यास भिष्मनारायण केंद्रे यांना घवघवीत यश आले आहे. आकरा जागांपैकी सात जागांवर यश आले आहे. तर विरोधकांना चार जागांवर समाधान मानावे लागले आहे. गतवेळी केंद्रे यांच्या पत्नी पद्मावती केंद्रे या सरपंच होत्या. त्या पुन्हा यावेळीस विजयी झाल्या आहेत.